भामरागड, चपराळा अभयारण्य वाऱ्यावर
By Admin | Updated: September 6, 2014 01:55 IST2014-09-06T01:55:48+5:302014-09-06T01:55:48+5:30
गडचिरोली जिल्हा विविध जातीच्या वनांनी नटलेला आहे. जिल्ह्यात बहुमोल वनस्पतींची भरमार आहे. भामरागड, चपराळा असे दोन अभयारण्य आहेत.

भामरागड, चपराळा अभयारण्य वाऱ्यावर
आष्टी : गडचिरोली जिल्हा विविध जातीच्या वनांनी नटलेला आहे. जिल्ह्यात बहुमोल वनस्पतींची भरमार आहे. भामरागड, चपराळा असे दोन अभयारण्य आहेत. परंतु या दोन्ही अभयारण्याचा कार्यभार एकाच वनपरिक्षेत्राधिकाऱ्याच्या भरवशावर असून दोन्ही अभयारण्यातील वनसंपत्ती व प्राण्यांच्या जीविताला धोका होण्याची शक्यता वाढली आहे.
चौडमपल्ली वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या चपराळा अभयारण्याचे वनपरिक्षेत्राधिकारी क्रिष्णा पाटील यांची घोट येथे बदली झाल्याने सध्या भामरागडचे वनपरिक्षेत्राधिकारी बडोदे मागील दोन महिन्यांपासून चपराळा अभयारण्याचा कार्यभार सांभाळत आहेत. त्यामुळे त्यांना काम करतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. चौडमपल्ली वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर अंतर्गत चपराळा अभयारण्य २५ फेब्रुवारी १९८६ ला घोषित करण्यात आले. या चपराळा वन्यजीव अभयारण्याचे नाव चपराळा गावावरून पडले आहे. या अभयारण्याचे क्षेत्र मुलचेरा व चामोर्शी या दोन तालुक्यात पसरले आहे.
अभयारण्यात रानमांजर, रानटी कुत्रा, चितळ, नीलगाय, तडस, हनुमान लंगुर, शेकरू, कोल्हा, रानडुकर आदींसह अनेक वन्यप्राण्यांची वास्तव्य आहे. मध्यंतरी या अभयारण्यात तीन वाघांनी प्रवेश केला होता. मात्र त्यांना राहण्यासाठी सुरक्षित क्षेत्र नसल्याची जाणीव होताच ते निघून गेले. याबरोबरच या अभयारण्यात सरपटणारे प्राणी व अनेक प्रजातींचे १९२ पेक्षा अधिक जीव वास्तव्यास आहेत. चपराळा अभयारण्याच्या हद्दीत एकूण सहा गावांचा समावेश आहे. यात चपराळा, चौडमपल्ली यासह अन्य चार गावांचा समावेश आहे. या अभयारण्याचे क्षेत्रफळ १३४ चौ. किमी आहे. परंतु एवढ्या मोठ्या क्षेत्राचा कार्यभार केवळ एका वनपरिक्षेत्राधिकाऱ्याकडे असल्याने वन्यप्राण्यांना धोका होऊ शकतो.