भामरागडात पोलीस वसाहतीवर कोसळले झाड
By Admin | Updated: June 21, 2015 02:18 IST2015-06-21T02:13:38+5:302015-06-21T02:18:35+5:30
भामरागड तालुक्यातील पर्लकोटा, पामुलगौतम, इंद्रावती या नद्यांचा जलस्तर झपाट्याने वाढत आहे.

भामरागडात पोलीस वसाहतीवर कोसळले झाड
दोन मार्ग झाले बंद : दोन दिवसांपासून वीज व दूरध्वनी सेवा ठप्प
भामरागड : भामरागड तालुक्यातील पर्लकोटा, पामुलगौतम, इंद्रावती या नद्यांचा जलस्तर झपाट्याने वाढत आहे. सध्या भामरागड-लाहेरी, भामरागड-नारगुंडा-कोठी या मार्गावरची वाहतूक बंद झाली आहे. रस्त्यावर शेकडोच्या संख्येने झाडे पडले असून गेल्या दोन दिवसांपासून भामरागडची वीज व दूरसंचार सेवा ठप्प झाली आहे.
शनिवारी भामरागडात दिवसभर पाऊस सुरू होता. हा पाऊस रात्री उशीरापर्यंत असाच सुरू राहिल्यास भामरागड, आलापल्लीचाही संपर्क तुटेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. भामरागड पोलीस ठाण्याच्या कर्मचारी वसाहतीवर झाड पडले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलीस कर्मचाऱ्यांनी शनिवारी दिवसभर वसाहतीवर पडलेले झाड हटविण्याचे काम केले. भामरागडातील वीज व मोबाईल सेवा बंद असली तरी इंटरनेट सेवा सुरू असल्यामुळे नागरिकांना संपर्कासाठी थोडा दिलासा मिळाला आहे. भामरागड गावात मोठ्या प्रमाणावर झाडांची पडझड झाली आहे.
तालुक्यातील नद्या व नाल्यांचा जलस्तर वाढत असल्याने पूर परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)