धानासह सोयाबीन पिकावर रोग बरसला
By Admin | Updated: September 30, 2014 23:36 IST2014-09-30T23:36:22+5:302014-09-30T23:36:22+5:30
गडचिरोली जिल्ह्यात धान हे प्रमुख पीक आहे. मात्र यंदा धानावर कडा करपा, करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने बळीराजा चिंतीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनात मोठा आर्थिक फटका बसण्याची

धानासह सोयाबीन पिकावर रोग बरसला
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात धान हे प्रमुख पीक आहे. मात्र यंदा धानावर कडा करपा, करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने बळीराजा चिंतीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनात मोठा आर्थिक फटका बसण्याची स्थिती निर्माण झाली आहे. कृषी विभागानेही रोगाचा प्रादुर्भाव झाल्याची परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांना रोग प्रतिबंधक उपाययोजना सुचविल्या आहे.
गडचिरोली जिल्ह्यात धानपीकाचे क्षेत्र १ लाख ४९ हजार २६० हेक्टर आहे. सोयाबीन पिकाचे क्षेत्र ६ हजार ३२० हेक्टर, कापूस १ हजार २८० तर तूर ४ हजार २६० हेक्टर क्षेत्रावर आहे. खरीप हंगामातील पीक सध्या वाढीव अवस्थेत आहे. पावसात खंड पडल्यामुळे रोवणीचे काम मध्यंतरी खोळंबली होती. आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या व सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाल्याने रोवणीचे काम आटोपले असून जिल्ह्यात नियोजीत सर्व क्षेत्रावर पीक घेण्यात येत आहे, असे कृषी विभागाने म्हटले आहे. मात्र भाताचे पीक सध्या फुटव्याच्या व पोटऱ्या येण्याच्या अवस्थेत असताना समाधानकारक पाऊस झाल्याने पीक चांगले येईल, अशी आशा होती. मात्र भात पीकावर तुरळक प्रमाणात पाने गुंडाळणारी अळी व खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तसेच करपा व कडा करपा या रोगाचासुध्दा काही भागात प्रादुर्भाव दिसून येत आहे. या किडीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचा शेतीचा खर्चही फवारणीच्यासाठी नियोजित अंदाजपत्रकापेक्षा वाढत आहे. यंदा पाऊस उशीरा आल्याने मजुरीचा व मशागतीचा खर्चही वाढला आहे. दरवेळी ठरलेल्या वेळापत्रकापेक्षा शेतकऱ्यांना फवारणीचे अधिक डोज द्यावे लागत आहे. सोयाबीन पिकावरही हिरवी उंट अळी व तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. कृषी विभागाचे कर्मचारी शेतकऱ्यांना यावर उपाययोजना सुचवित असले तरी अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीनचे पीक किडीच्या प्रादुर्भावामुळे हातून जाण्याच्या परिस्थिती आहे. कपाशीचे पीक फूल व बोंड पकडण्याच्या अवस्थेत आहे. उशीरा पेरणी झालेले पीक वाढीव अवस्थेत आहे. कापसावरही तुडतुड्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तूर पीकावर मर आणि पान खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. एकूणच खरीप हंगामातील चारही प्रमुख पीक किडीच्या विळख्यात सापडल्याने बळीराजाचे डोळे पाणावलेले आहेत. यंदा पावसाने उशीरा हजेरी लावली. कर्ज काढून शेतकरी शेती करीत असताना आता हातातोंडाशी आलेले पीक किडीच्या प्रादुर्भामुळे उद्ध्वस्त होण्याची पाळी आली आहे. त्यामुळे बळीराजा त्रस्त झाला आहे.