चार लाख नागरिकांना अन्न सुरक्षेचा लाभ
By Admin | Updated: November 30, 2014 23:04 IST2014-11-30T23:04:41+5:302014-11-30T23:04:41+5:30
केंद्र शासनाने २०१३ पासून संपूर्ण देशात अन्न सुरक्षा योजना सुरू केली असून या योजनेचा लाभ जिह्यातील ३ लाख ८२ हजार ८२ नागरिकांना दिला जात आहे. त्याचबरोबर ९० हजार ७४२ अंत्योदय कार्डधारक आहेत.

चार लाख नागरिकांना अन्न सुरक्षेचा लाभ
गडचिरोली : केंद्र शासनाने २०१३ पासून संपूर्ण देशात अन्न सुरक्षा योजना सुरू केली असून या योजनेचा लाभ जिह्यातील ३ लाख ८२ हजार ८२ नागरिकांना दिला जात आहे. त्याचबरोबर ९० हजार ७४२ अंत्योदय कार्डधारक आहेत. अन्न सुरक्षा योजना व अंत्योदय कार्डधारक असे मिळून जिल्ह्यात दर महिन्याला ५० हजार ८६० क्विंटल धान्य पुरविण्यात येते.
देशातील एकही नागरिक उपाशीपोटी रात्री झोपू नये यासाठी तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने संपूर्ण देशात अन्न सुरक्षा योजना सुरू केली. या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील जवळपास ८० टक्के नागरिकांना व शहरी भागातील ६० टक्के नागरिकांना अन्नधान्याचा पुरवठा करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले. या योजनेंतर्गत प्रती व्यक्ती, प्रती माह ५ किलो अन्नधान्य पुरविण्यात येते. त्यामध्ये ३ किलो तांदूळ व २ किलो गहू यांचा समावेश आहे. यापूर्वी बीपीएलधारक कुटुंबानाच स्वस्त धान्य उपलब्ध करून दिले जात होते. मात्र या योजनेत बीपीएलसोबत एपीएल कुटुंबातीलही नागरिकांचा समावेश करण्यात आला व त्यांना प्राधान्य कुटुंब हे नाव देण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात सद्य:स्थितीत ३ लाख ८२ हजार ८२ नागरिकांना अन्न सुरक्षा योजनेचे धान्य पुरविल्या जाते. गडचिरोली तालुक्यात अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देणाऱ्या नागरिकांची संख्या ५६ हजार ८५९, धानोरा तालुक्यात १४ हजार ४०२, चामोर्शी ६१ हजार २०५, घोट (चामोर्शी) ३० हजार ६०१, घोट (मुलचेरा) १४ हजार ३७१, देसाईगंज ४१ हजार ४५७, आरमोरी ५१ हजार ३०३, कुरखेडा १८ हजार ३४४, कोरची १७ हजार ९४६, अहेरी ३१ हजार ७०५, एटापल्ली ११ हजार २८४, भामरागड ८ हजार ८५३, सिरोंचा तालुक्यात २३ हजार ७५१ एवढी आहे. या सर्व नागरिकांना महिन्याचे ११ हजार ५६० क्विंटल तांदूळ व ७ हजार ५४० क्विंटल गव्हाची गरज भासते. प्राधान्य कुटुंबात बीपीएलसोबतच काही एपीएल कुटुंबातीलही नागरिकांचा समावेश झाला असल्याने लाभधारकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्याला अधिकच्या धान्याची गरज भासत आहे.
अंत्योदय योजनेचे जिल्ह्यात ९० हजार ७४२ कार्डधारक आहेत. अंत्योदय कार्डधारकांना प्रती कार्ड २५ किलो तांदूळ व १० किलो गहू देण्यात येते. जिल्ह्यातील अंत्योदय कार्डधारकांसाठी महिन्याला २२ हजार ६९० किलो तांदूळ व ९ हजार ७० क्विंटल गव्हाची गरज भासते. विशेष म्हणजे या योजनेंतर्गत ३ रूपये किलो तांदूळ व २ रूपये किलो गहू या दराने अन्नधान्याचा पुरवठा करण्यात येतो.
गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास ११ लाख एवढी आहे. अंत्योदय योजनेचे ९० हजार ७४२ कार्डधारक व अन्न सुरक्षा योजनेतील ३ लाख ८२ हजार ८२ नागरिक म्हणजेच जवळपास ८ लाख नागरिकांना रेशन दुकानातून अन्नधान्य पुरविल्या जाते. हे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या जवळपास ८० टक्के एवढे आहे.
मागील काही दिवसांपासून अन्नधान्याच्या किंमती प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. दिवसाची मजुरी दोनवेळच अन्नधान्य व भाजीपाला खरेदी करण्यातच खर्च होते. कित्येक मोठ्या कुटुंबाना अन्नधान्य खरेदी करणेही शक्य होत नव्हते. अशा परिस्थितीत शासन अत्यंत कमी दरात अन्नधान्याचा पुरवठा करीत असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने सुरू केलेली योजना भाजप सरकार बंद करणार की काय अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र नवीन सरकारने या योजनेमध्ये कोणताही बदल न करता सदर योजना सुरू ठेवली आहे. या योजनेमुळे अनेकांच्या घरी दिवसातून एकदाच पेटणारी चूल आता सकाळी व सायंकाळी पेटण्यास मदत होत आहे. (नगर प्रतिनिधी)