मुद्रा योजनेचा लाभ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:38 IST2021-05-07T04:38:18+5:302021-05-07T04:38:18+5:30
कुरखेडा : केंद्र सरकारने बेरोजगारांना स्वयंरोजगार स्थापित करण्याच्या उद्देशाने मुद्रा लोन योजना या संकल्पनेच्या माध्यमातून कमी व्याज व कमी ...

मुद्रा योजनेचा लाभ द्या
कुरखेडा : केंद्र सरकारने बेरोजगारांना स्वयंरोजगार स्थापित करण्याच्या उद्देशाने मुद्रा लोन योजना या संकल्पनेच्या माध्यमातून कमी व्याज व कमी कागदपत्रांवर कर्ज देण्याची योजना सुरू केली. मात्र, कर्ज देण्यास अनेक बँका चालढकल करीत आहेत.
जप्तीची वाहने पडूनच
चामोर्शी : अपघात झाल्याने काही प्रमाणात मोडलेली वाहने अपघातानंतरच्या न्यायालयीन प्रकरणामुळे, कागदपत्रांअभावी पोलीस ठाण्यातच ठेवली आहेत. ही वाहने बाहेरच असल्याने भंगार झाली आहेत. या वाहनांचा लिलाव केल्यास गरजू व्यक्तींना मिळतील.
वाहनचालकांवरील कारवाई थंडबस्त्यात
काेरची : तालुक्यात अनेक दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारक दारू प्राशन करून वाहन चालवितात. याकडे वाहतूक तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष होत आहे.
अतिक्रमणामुळे जंगल धोक्यात
आलापल्ली : वनजमिनीवर मिळेल त्या ठिकाणी अतिक्रमण करणे सुरू आहे. गरज नसतानाही लोक अतिक्रमण करीत आहेत. परिणामी जिल्ह्यातील वनक्षेत्र कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
खुल्या जागा कुचकामी
देसाईगंज : नगरपालिका क्षेत्रात अनेक वाॅर्डांमध्ये ओपन स्पेस आहेत. मात्र, काही मोजक्याच ओपन स्पेसला संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे. अनेक ठिकाणच्या ओपन स्पेसला संरक्षक भिंत नाही. त्यामुळे येथे कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते.
वसतिगृह निर्मिती करा
आरमोरी : आरमोरी तालुक्यात समाजकल्याण विभागाचे मुलांचे वसतिगृह नसल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांना इतर वसतिगृहांमध्ये धाव घ्यावी लागत आहे. मात्र, या विद्यार्थ्यांना तेथे प्रवेश मिळेल याची शाश्वती नसते. त्यामुळे वसतिगृह निर्माण करावे, अशी मागणी होत आहे.
दिभना मार्गाचे रुंदीकरण करा
गडचिरोली : वनविभागाचा नाका ते दिभना मार्गावर दिवसभर वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे या मार्गाचे रुंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या मार्गाची सध्या दुरवस्था झाली असल्याने दुरुस्तीसह रुंदीकरण करावे, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.
फवारणी न झाल्याने डासांचा प्रादुर्भाव
अहेरी : आरोग्य विभागाच्या वतीने गावागावांत फवारणी न झाल्याने यंदा डासांचा प्रादुर्भाव अधिक वाढणार आहे. सध्या डासांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. आलापल्ली शहरात नाल्यांचा उपसाही नियमितपणे हाेत नाही.
माहिती केंद्र निर्माण करण्याची मागणी
काेरची : केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांच्या माहितीअभावी नागरिक योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे तालुकास्तरावर कायमस्वरूपी जनसंपर्क कार्यालयाची निर्मिती करावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून हाेत आहे.
ग्राहकांना मिळते बनावट बिल
गडचिरोली : प्रत्येक ग्राहकाला जीएसटी क्रमांक असलेले बिल देणे गरजेचे असतानाही काही अपवादात्मक दुकानदार वगळता बहुतांश दुकानदार डुप्लिकेट बिल देऊन फसवणूक करीत आहेत. शहरी भागातील अनेक दुकानदार जीएसटी क्रमांक नसलेले बनावट बिल ग्राहकांना देत आहेत.
रखडलेले अनुदान मिळण्याची आशा
गडचिराेली : तालुक्यात धडक सिंचन विहीर योजनेची कामे करण्यात आली. विहीर खोदकाम केलेल्या लाभार्थ्यांना धनादेश देण्याचे आदेश आहेत. मात्र, मंजूर झालेल्या विहिरींचे खोदकाम करूनही अनुदान मिळत नसल्याने अनेकांची कामे रखडली आहेत. निवेदनाची दखल घेऊन अनुदान देण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू कल्या आहेत.
दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण करावे
अहेरी : केंद्र व राज्य शासनाने दिव्यांगांच्या हितासाठी अनेक योजना तयार केल्या आहेत. मात्र, तालुक्यात योजनांची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे दिव्यांग विकासापासून वंचित आहेत. प्रशासनाने दिव्यांगांचे सर्वेक्षण करून विकास योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी परिसरातील दिव्यांग व्यक्तीकडून करण्यात येत आहे.
हागणदारीमुक्तीवर प्रश्नचिन्ह
देसाईगंज : बहुतांश नागरिकांकडे शौचालय आहे ; मात्र ग्रामीण भागातील नागरिक शौचालयाचा वापरच करीत नाहीत. परिणामी, शौचालयाचा वापर न झाल्याने हागणदारीमुक्त गाव निर्माण करणे अडचणीचे झाले आहे. घरी शाैचालय असूनही ग्रामीण भागातील वयाेवृद्ध बाहेर शाैचास जात आहेत.
बसस्थानकाचा प्रश्न अद्यापही प्रलंबितच
चामाेर्शी : तालुक्याची निर्मिती होऊन अनेक वर्षांचा कालावधी लोटला. लाेकप्रतिनिधींनी बसस्थानक उभारू, अशी ग्वाही अनेकवेळा दिली. मात्र, अद्यापही हा प्रश्न निकाली निघाला नसल्याने नाराजी आहे.
प्रखर दिव्यांमुळे अपघाताचा धोका
गडचिराेली : दुचाकी वा चारचाकी वाहनांपुढे दिवे (हेड लाईट) लावले जातात. मात्र, काही तरुण साधे दिवे न लावता निळ्या रंगाचे तसेच प्रखर दिवे लावत असल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. काही युवक आपल्या दुचाकी वाहनांना प्रखर दिवे लावून लक्ष विचलित करतात. अशांवर कारवाई करावी, अशी मागणी हाेत आहे.
ग्रामीण भागात वीजचोरी वाढली
गडचिरोली : जिल्ह्यातील ग्रामीण भागात वीजचोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. याकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याने वीज महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. मात्र, वीजचोरीचा भूर्दंड इतर नागरिकांना सहन करावा लागत आहे. दुर्गम व ग्रामीण भागात कार्यक्रमांदरम्यान विजेच्या तारांवर आकडा टाकून वीजचोरी केली जात आहे.
मुरखळ्यातील पाणंद रस्त्याची दुरवस्था
चामाेर्शी : तालुक्याच्या मुरखळा येथील रामसागर गावाकडे जाण्यासाठी असलेल्या पाणंद रस्त्याचे मातीकाम १० वर्षांपूर्वी करण्यात आले. मात्र, संबंधित विभागाचे रस्ता मजबुतीकडे दुर्लक्ष झाल्याने पाणंद रस्त्याची दुरवस्था झाली आहे. परिणामी पावसाळ्याच्या दिवसात शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शेतातील उत्पादित माल व शेतशिवारात जाण्यासाठी महसूल दफ्तरी नाेंद असलेले पाणंद रस्ते आहेत. त्या रस्त्याने शेतकऱ्यांना ये-जा करणे साेयीचे हाेईल.
बोधनखेडा रस्त्याची दुर्दशा कायम
धानोरा : तालुक्यातील कुलभट्टी-बोधनखेडा या कच्च्या मार्गाची पूर्णत: दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना व पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. कुलभट्टी ते बोधनखेडा हे सात किमीचे अंतर असून या मार्गावरील गिट्टी पूर्णत: उखडली आहे. सदर मार्ग जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतो. सदर मार्गावर दोन नाले असून त्यावर पुलाचा अभाव आहे. नाल्यावर पूल बनविणे आवश्यक आहे. पावसाळ्यात चार महिने या मार्गावरील वाहतूक बंद असते.
शेणखत ढिगाने आराेग्य धाेक्यात
भेंडाळा : चामाेर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील मुरखळा-कान्होली मार्गावर मुरखळा गावातील शेतकरी अनेक वर्षांपासून शेणखताचे ढिगारे टाकतात. त्यामुळे नागरिकांचे आराेग्य धाेक्यात आले आहे. गावापासून काही अंतरावर शेणखताचे ढिगारे दिसून येतात. याच मार्गावर लोकमान्य विद्यालय आहे. त्यामुळे विद्यार्थी ये-जा करीत असतात. रस्त्याच्या अगदी बाजूला खताचे ढिगारे टाकण्यात आले आहेत. उंच असलेल्या ढिगाऱ्यावरून कचरा खाली उतरून रस्त्यापर्यंत पाेहोचताे.
दुर्गम मरीगुड्डम गाव विकासापासून काेसाेदूर
सिराेंचा : तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावर असलेले जंगलालगतचे मरीगुड्डम गाव स्वातंत्र्यांच्या ७३ वर्षांनंतर विकासापासून काेसाेदूर आहे. या गावाला जाण्यासाठी अद्याप पक्का रस्ता नाही. त्यामुळे महामंडळाची बस जात नाही. मार्गावर नाला असून या नाल्यावरील रपटा खराब झाला आहे. सातत्याने मागणी करूनही शासन, प्रशासनाचे या गावाकडे कायम दुर्लक्ष झाले आहे. मरीगुड्डम हे गाव मेडाराम ग्रामपंचायतींतर्गत येते. येथे ४० घरांची वस्ती असून लाेकसंख्या २०० आहे. संपूर्ण गाव शेती व्यवसायावर अवलंबून असून आदिवासीबहुल आहे.
अतिक्रमणधारकांना वनहक्क मिळेना
कुरखेडा : तालुक्यातील काही अतिक्रमणधारकांना वनहक्काचे पट्टे मंजूर करण्यात आले आहेत. मात्र, गावातील इतर अतिक्रमणधारकांना अद्यापही वनहक्क पट्टे देण्यात आले नाहीत. त्यामुळे त्यांना शासनाच्या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. यासंदर्भात वनहक्क समित्यांच्या वतीने शासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला आहे. परंतु,अनेक दिवसांचा कालावधी लोटूनही त्यांना वनहक्क पट्टे मिळाले नाहीत. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन जमिनीचे पट्टे द्यावेत, अशी मागणी होत आहे.
महागावातील साैरदिवे नादुरुस्त ; बॅटऱ्याही लंपास
महागाव (बु.) : अहेरी तालुक्यातील महागाव येथे शासनातर्फे चाैकात तसेच गावाच्या शेवटच्या टाेकावर साैरदिवे लावण्यात आले आहेत. परंतु, साैरदिव्यांच्या बॅटऱ्या अज्ञातांनी लंपास केल्या आहेत. तसेच साैरदिवेही नादुरुस्त झाले आहेत. त्यामुळे ज्या उद्देशाने साैरदिवे लावण्यात आले, त्या उद्देशाला हरताळ फासला जात आहे. अनेक महिन्यांपासून साैरदिवे बंद असल्याने दिव्यांचे खांब केवळ शाेभेच्या वस्तू बनल्या आहेत. विशेष म्हणजे, काही साैरदिव्यांच्या बॅटऱ्या तसेच प्लेटसुद्धा अज्ञातांनी लंपास केले. आता केवळ खांब दिसून येत आहेत. रात्री या भागात अंधार पसरताे. सरपटणाऱ्या प्राण्यांमुळे जीवाला धाेका हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.