जिल्ह्यात अमृत आहार योजनेचे लाभार्थी दुपटीवर
By Admin | Updated: February 6, 2017 01:34 IST2017-02-06T01:34:39+5:302017-02-06T01:34:39+5:30
भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेंतर्गत सुरूवातीच्या काळात गरोदर व स्तनदा माता मिळून

जिल्ह्यात अमृत आहार योजनेचे लाभार्थी दुपटीवर
प्रतिसाद वाढला : दुसऱ्या टप्प्यांतर्गत ६३ हजार बालकांना आहार
गडचिरोली : भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेंतर्गत सुरूवातीच्या काळात गरोदर व स्तनदा माता मिळून जवळपास साडेपाच हजार लाभार्थ्यांना लाभ मिळत होता. मात्र आता या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या दुप्पट झाली असून सद्य:स्थितीत जिल्हाभरात ११ हजार ३७५ लाभार्थ्यांना एकवेळ चौरस आहार दिला जात आहे. सदर योजनेला लाभार्थ्यांचा प्रतिसाद वाढला असून टप्पा दोन अंतर्गत अंडी व केळीचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी बालकांची संख्या सद्य:स्थितीत ६३ हजार ९६७ इतकी आहे.
अनुसूचित क्षेत्र व अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रातील गरोदर स्त्रियांना शेवटच्या तिमाहीमध्ये व स्तनदा मातेस बाळंतपणानंतर पहिल्या तिमाहीमध्ये एकवेळ चौरस आहार देण्यासाठी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना १८ नोव्हेंबर २०१५ च्या शासन निर्णयान्वये १ डिसेंबर २०१५ पासून गडचिरोली जिल्ह्यात सुरू करण्यात आली. त्यावेळी लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या जवळपास साडेपाच हजारावर होती. मात्र २०१६ मध्ये गरोदर, स्तनदा माता लाभार्थी संख्या दुपटीवर पोहोचली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
टप्पा दोन अंतर्गत सर्वाधिक अहेरी तालुक्यात लाभार्थी
५ आॅगस्ट २०१६ च्या शासन निर्णयानुसार सात महिने सहा वर्ष वयोगटातील बालकांना ऋतूमानानुसार आठवड्यातून चार दिवस अंडी व केळी देण्याची योजना टप्पा दोन अंतर्गत कार्यान्वित करण्यात आली. या योजनेंतर्गत सदर वयोगटातील अहेरी तालुक्यात सर्वाधिक १० हजार १०१ बालके लाभ घेत आहेत. आरमोरी तालुक्यात ४ हजार ३०४, भामरागड ३ हजार ८०७ तर चामोर्शी तालुक्यात ६ हजार ५५१ बालकांना लाभ मिळत आहे. देसाईगंज तालुक्यातील १ हजार २७६, धानोरा ७ हजार ६५५, एटापल्ली ७ हजार ९४७, गडचिरोली २ हजार ३४५, कोरची ४ हजार ३५३, कुरखेडा ६ हजार ९९४, मुलचेरा २ हजार १३४ व सिरोंचा तालुक्यातील ६ हजार ५०० बालकांना अंडी व केळीचा लाभ मिळत आहे.