धानोरातील शिक्षकांचे आंदोलन मागे
By Admin | Updated: July 5, 2015 01:46 IST2015-07-05T01:46:21+5:302015-07-05T01:46:21+5:30
तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे माहे मे २०१५ मधील वेतन तरतूद प्राप्त होऊनही शिक्षकांना देण्यात आले नव्हते. वेतन निकाली काढण्याच्या मागणीसाठी ...

धानोरातील शिक्षकांचे आंदोलन मागे
सभापती व बीडीओंचे आश्वासन : दोन दिवसांत वेतन देणार
धानोरा : तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे माहे मे २०१५ मधील वेतन तरतूद प्राप्त होऊनही शिक्षकांना देण्यात आले नव्हते. वेतन निकाली काढण्याच्या मागणीसाठी स्थानिक पं. स. कार्यालयासमोर ६ जुलै रोजी एकदिवशीय धरणे आंदोलन करण्याचा इशारा प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने देण्यात आला होता. याची दखल घेत पं.स सभापती व संवर्ग विकास अधिकारी यांनी समितीला वेतन निकाली काढण्याचे आश्वासन समितीला दिले. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांचे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पं. स. सभापती कल्पना वड्डे व संवर्ग विकास अधिकारी पी. एस. कोल्हे यांनी समितीच्या शिष्टमंडळा चर्चेसाठी पाचारण केले. गटशिक्षणाधिकारी रमेश उचे यांच्याशी चर्चा करुन मे २०१५ चे प्रलंबित वेतन दोन दिवसात निकाली काढण्याचे आश्वासन दिले. याशिवाय सहाव्या वेतन आयोग थकबाकीचा ५वा हप्ता जमा करणे, १५ टक्के प्रोत्साहन भत्त्याची थकबाकी काढणे, अप्रशिक्षित शिक्षण सेवकांना अप्रशिक्षित शिक्षकांची वेतनश्रेणी लावण्याचा प्रस्ताव जि. प. ला पाठविणे यासह अन्य समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला देण्यात आले. इतर समस्यांवर चर्चा करण्यासाठी समितीला २० जुलैला पाचारण करण्यात आले. शिष्टमंडळात तालुकाध्यक्ष डंबेश पेंदाम, अण्णा बावणथडे, नरेश गेडाम, ओमप्रकाश सिडाम, दिलीप शेडमाके, अनिल मेश्राम, राजेंद्र भजभुजे, सेलोकर, सोमेश दुगे, उईके नरेंद्र पेंदाम, रवींद्र घोंगडे, भोयर, दरडे उपस्थित होते.