बेजूर गावात तलाव खोदकामाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2017 01:50 IST2017-01-21T01:50:22+5:302017-01-21T01:50:22+5:30
सिंचनाच्या सुविधेपासून कायम वंचित असलेल्या भामरागड तालुक्यातील गावांमध्ये शेतकऱ्यांसाठी सिंचन सुविधा निर्माण व्हावी,

बेजूर गावात तलाव खोदकामाला सुरुवात
लोकबिरादरी प्रकल्पाची मदत : सिंचन सुविधा उपलब्ध होणार
रमेश मारगोनवार भामरागड
सिंचनाच्या सुविधेपासून कायम वंचित असलेल्या भामरागड तालुक्यातील गावांमध्ये शेतकऱ्यांसाठी सिंचन सुविधा निर्माण व्हावी, या हेतूने शेतकऱ्यांच्या सहभागातून लोकबिरादरी प्रकल्पाच्या मदतीने काही गावांमध्ये तलाव खोदकाम हाती घेण्यात आले आहे. गेल्यावर्षी जिंजगाव येथे तलाव खोदकाम केल्यानंतर यंदा बेजूर गावात तलाव खोदकामाला सुरुवात करण्यात आली आहे.
भामरागड तालुका हा राज्यपालांनी दत्तक घेतलेला तालुका आहे. मात्र या तालुक्यात विविध समस्या आवासून उभ्या आहेत. नद्या असून त्या नद्यांच्या पाण्यावर प्रकल्प नसल्याने सिंचनाची सुविधा नाही. केवळ पावसाच्या भरवशावर या भागातील शेतकरी अवलंबून राहून शेती करीत आहे. या शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने लोकबिरादरी प्रकल्पाने डॉ. प्रकाश, डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या मार्गदर्शनात अनिकेत आमटे यांच्या पुढाकारातून तलाव खोदण्याचे काम सुरू केले आहे. गेल्यावर्षी जिंजगाव येथे तलावाचे खोदकाम करण्यात आले होते. यावर्षी जानेवारी महिन्यातच बेजूर गावात लोकबिरादरी प्रकल्पाच्या मदतीने मोठ्या तलावाचे खोदकाम करण्यास सुरुवात झाली आहे.
पाण्याशिवाय विकास अशक्य असल्याने तलाव खोदकाम हाती घेण्यात आले असल्याचे लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे यांनी म्हटले आहे. तलाव निर्माण झाल्यावर परिसरातील शेतकऱ्यांना दोन पीक तलावाच्या पाण्यामुळे घेणे सोयीचे होईल. तसेच येथे मासेमारीही करता येईल. जमिनीतील पाण्याचा साठा वाढेल व परिसरातील जलस्त्रोतांना पाणी उपलब्ध होईल. सदर तलावाचे काम हे लोकसहभागातून केले जाणार आहे, असेही अनिकेत आमटे यांनी सांगितले.