मोबाईल चोरल्याच्या वादातून भिकाऱ्याचा खून
By Admin | Updated: July 27, 2015 03:09 IST2015-07-27T03:09:06+5:302015-07-27T03:09:06+5:30
मोबाईल चोरल्याचा आरोप करून देसाईगंज रेल्वे स्टेशनवर भीक मागणाऱ्या इसमाचा खून दोन आरोपींनी केल्याची

मोबाईल चोरल्याच्या वादातून भिकाऱ्याचा खून
चुरमुरा : मोबाईल चोरल्याचा आरोप करून देसाईगंज रेल्वे स्टेशनवर भीक मागणाऱ्या इसमाचा खून दोन आरोपींनी केल्याची घटना आरमोरी-देसाईगंज मार्गावरील कासवी फाट्यानजीकच्या जंगलात रविवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. मधू शेंडे असे हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे. तर या प्रकरणातील आरोपी शंकर विठोबा ठेंगरी व दादाराव निंबाजी गजभिये रा. वडसा हे दोघे जण फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास मधू शेंडे हा वडसा रेल्वे स्टेशन प्लॅटफार्मवर भिक मागण्यासाठी बसला होता. दरम्यान आरोपी शंकर ठेंगरी व दादाराव गजभिये हे रेल्वे स्टेशन प्लॅटफार्मवर येऊन बसले. तेव्हा भिकारी मधू शेंडे याने दादाराव गजभिये याचा मोबाईल घेऊन गाणे ऐकत बसला. त्यानंतर ठेंगरी व गजभिये हे दोघेही जण दारू पिण्यासाठी नवेगाव बांध येथे गेले. दारू प्राशन करून ते रेल्वेने वडसा येथे परत येत असताना भिकारी मधू शेंडे हा वडेगाव येथील रेल्वे स्टेशनवर भिक मागताना दोघांनाही दिसला. दरम्यान शंकर ठेंगरी याने भिकारी मधू याला रेल्वेगाडीत बसविले. त्याला मोबाईल परत दे असे म्हणून त्याच्याशी वाद घातला. तसेच मारहानही केली. त्यानंतर वडसा रेल्वे स्टेशनवर आल्यावर शंकर ठेंगरी याने आपली दुचाकी घेऊन भिकारी मधू शेंडे, दादाराव गजभिये व फिर्यादी अब्दूल कदिर शेख यांना दुचाकीवर बसवून कासवी जंगलात नेले. त्यानंतर आरोपी शंकर ठेंगरी व दादाराव गजभिये याने स्टिल रॉडने मधूला बेदम मारहान करून त्याची हत्या केली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी अब्दलू शेख यांनी पोलिसांना दिली. (वार्ताहर)