वैरागड किल्ल्याच्या सौंदर्यीकरणाचे काम रखडले
By Admin | Updated: March 12, 2015 02:00 IST2015-03-12T02:00:37+5:302015-03-12T02:00:37+5:30
पुरातत्व विभागाच्या अखत्यारित येत असलेले वैरागड येथील किल्ल्याच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू झाले होते. नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात किल्ल्याच्या तटा, बुरूजावरचे झाडे, झुडूपी तोडण्यात आले.

वैरागड किल्ल्याच्या सौंदर्यीकरणाचे काम रखडले
वैरागड : पुरातत्व विभागाच्या अखत्यारित येत असलेले वैरागड येथील किल्ल्याच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू झाले होते. नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात किल्ल्याच्या तटा, बुरूजावरचे झाडे, झुडूपी तोडण्यात आले. मात्र निधी संपल्यामुळे फेब्रुवारी महिन्यापासून या किल्ल्याच्या सौंदर्यीकरणाचे काम रखडले आहे. या किल्ल्याच्या सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण होण्यासाठी पुरातत्व विभागाने पुरेसा निधी मंजूर करून उपलब्ध करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात एकमेव वैरागड येथे पुरातन किल्ला आहे. या किल्ल्याचे संरक्षण झाल्यास व त्याला मूळ स्वरूप प्राप्त झाल्यास पुढील पिढ्यांना किल्ल्याचे सौंदर्य न्याहाळता येईल. पुरातत्व विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या या किल्ल्याचे सौंदर्यीकरण व्हावे, म्हणून शासन दरबारी अनेक प्रयत्न झाले. ब्रिटिश शासनाच्या काळात ‘क’ दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून घोषितही झाले. मात्र त्यानंतर वैरागडच्या किल्ल्याच्या विकासासाठी फारसे प्रयत्न झाले नाही. यंदा किल्ल्याच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र निधी संपल्याच्या कारणावरून सौंदर्यीकरणाचे काम ठप्प पडले आहे.
इ.स. १२ व्या शतकात चंद्रपूरचे तत्कालीन गोंड राजे बल्लाळशहाने वैरागडचा किल्ला बांधला. १२ एकरच्या जागेत पसरलेल्या किल्ल्याच्या चारही बाजुस तट आणि बुरूज आहे. किल्ल्याच्या आतील भागात राजाचा महाल होता. मात्र सदर महाल आता जमीनदोस्त झाला आहे. विविध आकाराच्या सात विहिरी किल्ल्यात आहेत. समोर मुख्य प्रवेशद्वार व बाहेर पडण्यासाठी मागील भागात एक दरवाजा आहे. १८ बुरूज एकत्र असलेला हा किल्ला उत्तम कारागिरीचा नमूना आहे. (वार्ताहर)