आरोग्य क्षेत्रात स्वयंपूर्ण व्हा
By Admin | Updated: February 27, 2015 01:18 IST2015-02-27T01:18:29+5:302015-02-27T01:18:29+5:30
विकासाच्या बाबतीत गडचिरोली जिल्हा मागास असला तरी येथील जिल्हा सामान्य रुग्णालय राज्यातील इतर रुग्णालयांच्या तुलनेत स्वच्छ, निटनेटके आहे.

आरोग्य क्षेत्रात स्वयंपूर्ण व्हा
गडचिरोली : विकासाच्या बाबतीत गडचिरोली जिल्हा मागास असला तरी येथील जिल्हा सामान्य रुग्णालय राज्यातील इतर रुग्णालयांच्या तुलनेत स्वच्छ, निटनेटके आहे. त्याचबरोबर येथील कर्मचारी चांगली सेवा देत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपुर वापर करून गडचिरोली जिल्ह्याला आरोग्य क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवावे, असे आवाहन समाजसेविका डॉ. राणी बंग यांनी केले.
जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २६ फेब्रुवारी ते १२ मार्च या कालावधीदरम्यान महिला आरोग्य अभियान राबविणार आहे. या अभियानाचे उद्घाटन जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉ. राणी बंग यांच्या हस्ते २६ फेब्रुवारी रोजी करण्यात आले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे तर प्रमुख अतिथी म्हणून जि. प. उपाध्यक्ष जीवन नाट, महिला व बालकल्याण सभापती सुवर्णा खरवडे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल रूडे, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. शशीकांत शंभरकर, डॉ. किशोर वाघ, डॉ. माळाकोळीकर, रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. शैलजा मैदमवार, साथरोग अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील मडावी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. राणी बंग यांनी महिला विविध क्षेत्रात प्रगती करीत आहेत. मात्र गरोदरपणात त्यांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे प्रकर्षाने दिसून येते. या कालावधीत महिलांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. गडचिरोली जिल्ह्यात वंधत्वाची समस्या गंभीर आहे. याचा दोष मात्र महिलेवरच दिला जातो. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. वंधत्व असलेल्या महिलेला समाजाचे टोमणे ऐकावे लागतात.
गडचिरोली जिल्ह्यात गरीबीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्याही गंभीर आहेत. मात्र आपली आरोग्य यंत्रणा अतिशय सतर्क आहे. प्रत्येक आरोग्य कर्मचारी चांगली सेवा देत आहे. व्यसनाधिनता, कुपोषण याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी, महिला पंधरवड्याचे यशस्वीरित्या आयोजन करावे, असे आवाहन डॉ. राणी बंग यांनी केले. कार्यक्रमाला जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा परिषदेचे कर्मचारी, रुग्णालयातील महिला रुग्ण उपस्थित होत्या.
प्रास्ताविक डॉ. अनिल रूडे, संचालन डॉ. प्रवीण किलनाके तर आभार डॉ. रवी चौधरी यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)