भारतीय संविधानाच्या पाठीशी राहा
By Admin | Updated: December 29, 2014 23:42 IST2014-12-29T23:42:34+5:302014-12-29T23:42:34+5:30
बहुभाषिक, बहुधर्मिय, बहुजातीय अशी भारत देशाची रचना आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला बहाल केलेल्या भारतीय संविधानात जात, धर्म व विषमतेला स्थान नाही.

भारतीय संविधानाच्या पाठीशी राहा
गडचिरोली : बहुभाषिक, बहुधर्मिय, बहुजातीय अशी भारत देशाची रचना आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला बहाल केलेल्या भारतीय संविधानात जात, धर्म व विषमतेला स्थान नाही. ‘आम्ही भारताचे लोक’ या संविधानाच्या प्रास्ताविकेतच समानता भिनलेली आहे. त्यामुळे लोकशाहीच्या विरोधात सुरू असलेले षड्:यंत्र हाणून पाडण्यासाठी भारतीय संविधानाच्या पाठीशी खंभीरपणे उभे राहा, असे रोखठोक आवाहन सुविख्यात साहित्यीक तथा विचारवंत प्रा. डॉ. यशवंत मनोहर यांनी केले.
सांप्रदायिकता विरोधी कृती समिती गडचिरोलीच्यावतीने येथील पोटेगाव मार्गावरील गोंडवन कलादालनात आयोजित जातीय अत्याचार व सांप्रदायिकता विरोधी परिषदेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत जन आंदोलनांचे जिल्हा संयोजक माजी आमदार हिरामन वरखडे होते. मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. डॉ. रूपा कुलकर्णी, आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते जिंदा भगत, मुस्लीम परिषदेचे नेते प्रा. जावेद पाशा आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात भगवान बिरसा मुंडा, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीवीर भगतसिंग यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली.
पुढे बोलताना प्रा. डॉ. यशवंत मनोहर म्हणाले,
भारतीय संविधान हे मुल्यांचा व नैतिकतेचा कोष आहे. परिवर्तन घडवून आणणाऱ्या व्यक्तींवरच अलिकडे अन्याय व अत्याचार होत आहेत. त्यामुळे भारतीय लोकशाही धोक्यात आली आहे. भारतीय नागरिकांनी आपल्या समस्यांच्या मुळाचा शोध घेतला पाहिजे, असेही प्रा. डॉ. मनोहर यावेळी म्हणाले.
प्रा. डॉ. रूपा कुलकर्णी म्हणाल्या, सांप्रदायिकता हे विकृतीचे नाव आहे. जातीय व धार्मिक भांडणाचा चौकटीतल्या लोकांना धोका नाही. मनुस्मृती ग्रंथात शुद्र व अतिशुद्रांना कठोर शिक्षा सांगितल्या आहेत. शुद्रांवर अन्याय व अत्याचार करणाऱ्या या मनुस्मृतीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दहन केले. आता काही माणसाच्या मनात ‘मनू’ आहे. माणसाच्या मनामनातला हा मनू नष्ट झाला पाहिजे. तेव्हाच बहुजनांवरील अन्याय, अत्याचार नष्ट होतील, असेही प्रा. कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. महेश कोपुलवार, संचालन जगदश मेश्राम यांनी केले तर आभार प्रभू राजगडकर यांनी मानले. यावेळी रोहिदास राऊत, जि.प. सदस्य अमोल मारकवार, देवराव चवळे, प्रा. पंडीत फुलझेले, नासीन जुमन शेख, सुरेखा बारसागडे, जगन जांभुळकर आदीसह बहुसंख्य दलित, आदिवासी व अन्य नागरिक उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)