चारित्र्यवान विद्यार्थी घडवा
By Admin | Updated: September 6, 2015 01:14 IST2015-09-06T01:14:08+5:302015-09-06T01:14:08+5:30
भारतीय समाजात शिक्षकाला अनन्य साधारण महत्त्व आहे. प्रत्येक यशस्वी पुरूषांमागे त्यांच्या गुरूंचा मोलाचा वाटा असतो.

चारित्र्यवान विद्यार्थी घडवा
अशोक नेते यांचे आवाहन : जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा
गडचिरोली : भारतीय समाजात शिक्षकाला अनन्य साधारण महत्त्व आहे. प्रत्येक यशस्वी पुरूषांमागे त्यांच्या गुरूंचा मोलाचा वाटा असतो. पुरस्कारप्राप्त तसेच जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी चारित्र्यवान व सक्षम विद्यार्थी घडवावेत, असे आवाहन खा. अशोक नेते यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षकदिनी शनिवारी वीर बाबुराव शेडमाके सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन जि. प. अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे यांच्या हस्ते झाले.
यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ. क्रिष्णा गजबे, जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, जि. प. उपाध्यक्ष जीवन नाट, कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार, माजी जि. प. अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, सिनेट सदस्य प्रकाश गेडाम, जि. प. सदस्य पद्माकर मानकर, अशोक इंदूरकर, धर्मप्रकाश कुकुडकर, शांता परसे, सुखमा जांगधुर्वे, डायटचे प्राचार्य चवरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी नानाजी आत्राम, प्राथमिक शिक्षणाधिकारी माणिक साखरे, निरंतर शिक्षणाधिकारी नीलेश पाटील, गडचिरोलीचे गटशिक्षणाधिकारी उद्धव डांगे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्या १२ ही आदर्श शिक्षकांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व साडीचोळी देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.
सन्मानित झालेल्या शिक्षकांंमध्ये प्राथमिक विभागातून जि. प. प्राथमिक शाळा शिवणी बुज.चे शिक्षक गुलाब कवडू मने, कोसमी शाळेचे शिक्षक नरेश विठ्ठल जेंगठे, खरकाडा शाळेचे मिन्नाथ पंढरी नखाते, विठ्ठलगाव शाळेचे रमेश्वर खुशाल चिमनकर, मसेली जि. प. शाळेचे युनूस गफ्फार शेख, रंगेवाही शाळेचे अरूण परशुराम मेश्राम, सेवारी शाळेचे पुरूषोत्तम श्रावण पिपरे, गिलगाव शाळेचे जनार्धन घनश्याम म्हशाखेत्री, अंकिसा शाळेचे निवास बालाजी कोडाप, पेरमिली शाळेचे शिक्षक सुनिल बाबुराव कोडावार यांचा समावेश आहे. माध्यमिक विभागातून एटापल्ली जि. प. हायस्कूलचे वकील अहमद मो. शफी शेख, गडचिरोली जि. प. हायस्कूलचे दुर्गाप्रसाद पंढरी पाल आदींचा समावेश आहे.
पुढे बोलताना अशोक नेते म्हणाले, विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी आम्हा लोकप्रतिनिधींवर असून ती आता वाढली आहे. शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण सदैव तत्पर राहणार, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
आमदार क्रिष्णा गजबे यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शाळेतून घेतलेल्या पुस्तकी ज्ञानाचा समाजजीवनात उपयोग झाला पाहिजे. विद्यार्थ्यांचे पुुस्तकी ज्ञान जीवनात उतरण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावा, असे सांगितले.
जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता म्हणाल्या, केवळ नोकरीसाठी शिक्षक बनण्यापेक्षा विद्यार्थी, नागरिक व समाज यांना आदर वाटेल, असे शिक्षक बनावे. शिक्षकांनी केवळ परीक्षार्थी विद्यार्थी घडविण्यापेक्षा सक्षम व जबाबदार माणूस घडवून हाडाचे शिक्षक बनावे, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
जीवन नाट यांनी सांगितले की, पूर्वी शिक्षकांना समाजात प्रचंड सन्मान व प्रतिष्ठा होती. मात्र आज ही परिस्थिती बदलल्याचे चित्र दिसून येते. या संदर्भात शिक्षकांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे.
यावेळी जि.प. अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी शिक्षकांच्या कार्याच्या महतीवर प्रकाश टाकला. प्रास्ताविक प्राथमिक शिक्षणाधिकारी माणिक साखरे, संचालन विनोद दशमुखे यांनी केले. यावेळी शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)