सावधान, बिबट्या येऊ शकतो घरातही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2022 23:33 IST2022-09-29T23:32:58+5:302022-09-29T23:33:33+5:30
पणतुजी उसेंडी (७० वर्ष) असे जखमी वृद्धाचे नाव आहे. ते आपल्या घरी नेहमीप्रमाणे झोपले असताना बिबट्याने त्यांच्या घरात घुसून त्यांच्यावर हल्ला केला. आरडाओरड केल्याने घरातील आणि शेजारच्या लोकांनी धाव घेतली असता बिबट्याने पळ काढला. नातेवाइकांनी वनविभागाला या घटनेची माहिती दिली.

सावधान, बिबट्या येऊ शकतो घरातही
लाेकमत न्यूज नेटवर्क
जोगीसाखरा : आतापर्यंत जंगलात गेलेल्या इसमांवरच हल्ले करणारी श्वापदं आता चक्क गावात आणि घरात येऊन हल्ला करू लागली आहेत. आरमोरी तालुक्यातील कोरेगाव येथे आपल्या घरी झोपून असलेल्या इसमावर बिबट्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारच्या रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.
पणतुजी उसेंडी (७० वर्ष) असे जखमी वृद्धाचे नाव आहे. ते आपल्या घरी नेहमीप्रमाणे झोपले असताना बिबट्याने त्यांच्या घरात घुसून त्यांच्यावर हल्ला केला. आरडाओरड केल्याने घरातील आणि शेजारच्या लोकांनी धाव घेतली असता बिबट्याने पळ काढला.
नातेवाइकांनी वनविभागाला या घटनेची माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम, वनपाल सोनुले, वनरक्षक धात्रक यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. पणतुजी यांच्या चेहऱ्यावर खोलवर जखमा झाल्या आहेत. आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांना भरती करण्यात आले. आता त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.
वनविभागाचा दावा खोटा ठरविणारी घटना
- मनुष्य आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष हा केवळ जंगलातच होतो असे आतापर्यंत वनविभागाकडून सांगितले जात होते. पण या घटनेत बिबट्याने गावातच नाही तर चक्क घरात येऊन हल्ला केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आरमोरी तालुक्यात रोजच वाघ-बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडत आहेत. पण त्या रोखण्यासाठी वन विभाग कोणतेही ठोस पाऊल उचलताना दिसत नाही. ही बाब शेतकरी वर्गासाठी चिंतेचा विषय झाली आहे.