आयटकचा बीडीआेंना घेराव
By Admin | Updated: November 10, 2015 02:04 IST2015-11-10T02:04:30+5:302015-11-10T02:04:30+5:30
थकीत मानधन त्वरित द्यावे, यासह इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन संलग्न ....

आयटकचा बीडीआेंना घेराव
विविध मागण्या : शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे आरमोरीत आंदोलन
आरमोरी : थकीत मानधन त्वरित द्यावे, यासह इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन संलग्न आयटकच्या वतीने आरमोरी पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी सजनपवार यांना सोमवारी घेराव घालण्यात आला.
शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना आॅगस्ट २०१५ पासूनचे मानधन व इंधन बिल वितरित करण्यात आले नाही. तसेच चुकीच्या पद्धतीने कामावरून कमी करण्यात आलेल्या कामावर परत घेण्याचे आदेश असताना त्यांना कामावर रूजू करून घेण्यात आले नाही. त्यामुळे अशा कामगारांना परत कामावर परत घेण्यात यावे, शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना स्वयंपाक शिजविण्याव्यतिरिक्त इतर कोणतेही काम देऊ नये, शालेय पोषण आहार आहाराचे इंधन बिल मुख्याध्यापकाच्या खात्यावर जमा न करता प्रत्यक्ष कामगाराच्या खात्यावर जमा करण्यात यावे यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी संवर्ग विकास अधिकारी सजनपवार व गटशिक्षणाधिकारी हेमलता परसा यांना घेराव घालण्यात आला. अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. त्यांनी बहुतांश मागण्या मान्य केल्या.
आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद झोडगे, भाकपचे जिल्हा सचिव डॉ. महेश कोपुलवार, जि. प. सदस्य अमोल मारकवार, अॅड. जगदीश मेश्राम यांनी केले. यावेळी वर्षा गुंफलवार, रूपाली हेडाऊ, गुरूदेव रोहणकर, पठाण, पार्वता काटेंगे, पुष्पा मोहुर्ले, सुनीता किरंगे हजर होत्या. (प्रतिनिधी)