वैरागडचा पशुवैद्यकीय दवाखाना परिचराच्या भरवशावर
By Admin | Updated: October 25, 2014 22:39 IST2014-10-25T22:39:38+5:302014-10-25T22:39:38+5:30
शेतकरी व पशुपालकांच्या आजारी जनावरांवर वेळीच औषधोपचार व्हावा, याकरिता शासनाने गडचिरोली जिल्ह्यात पशुवैद्यकीय दवाखान्याची निर्मिती केली आहे. मात्र पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी

वैरागडचा पशुवैद्यकीय दवाखाना परिचराच्या भरवशावर
वैरागड : शेतकरी व पशुपालकांच्या आजारी जनावरांवर वेळीच औषधोपचार व्हावा, याकरिता शासनाने गडचिरोली जिल्ह्यात पशुवैद्यकीय दवाखान्याची निर्मिती केली आहे. मात्र पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी जिल्ह्यातील अनेक पशुवैद्यकीय दवाखाने सध्या कर्मचाऱ्यांच्या भरवशावर आहे. वैरागड येथील पशुवैद्यकीय दवाखाना पशुधन विकास अधिकाऱ्यांअभावी परिचराच्या भरवशावर असल्याचे वास्तव उजेडात आले आहे.
वैरागड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील कार्यरत पशुधन विकास अधिकारी डॉ. गणवीर यांचे अपघाती निधन झाले. या घटनेला एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. मात्र तेव्हापासून या पशुवैद्यकीय दवाखान्याला पशुधन विकास अधिकारी मिळाले नाही. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत याबाबीचा पाठपुरावा करून शासनस्तरावर वैरागडच्या दवाखान्यात नव्या पशुधन विकास अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. वैरागड हे आरमोरी तालुक्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचे गाव आहे. वैरागड हे परिसरातील १० ते १५ गावांचे मध्यवर्ती ठिकाण आहे. प्रशासनाने वैरागड येथे श्रेणी १ च्या पशुवैद्यकीय दवाखान्याची निर्मिती केली आहे. या दवाखान्याच्या हद्दीत मेंढा, वडेगाव, मोहझरी, सुकाम, मेंढेबोडी, पाठणवाडा, करपडा व लोहारा आदी गावे येतात. १५ गावांच्या पशुवैद्यकीय सेवेचा भार असलेल्या या दवाखान्यात पशुधन विकास अधिकारी नसल्याने या परिसरातील पशुपालकांना आजारी जनावरांवर औषधोपचार करणे जिकरीचे झाले आहे.
पशुधन विकास अधिकाऱ्याअभावी गंभीर आजारी जनावरे अनेकदा दगावली आहेत. वैरागड परिसरात पशुपालकांची संख्या मोठी आहे. जनावरांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने या दवाखान्यात पशुधन विकास अधिकाऱ्यांची तत्काळ नियुक्ती करावी, अशी मागणी वैरागड परिसरातील पशुपालकांनी केली आहे. (वार्ताहर)