बरगे यांच्यासह दोन लिपिकांना पुन्हा घेणार पोलीस ताब्यात
By Admin | Updated: March 26, 2015 01:31 IST2015-03-26T01:31:11+5:302015-03-26T01:31:11+5:30
जिल्ह्यात समाज कल्याण विभाग व आदिवासी विकास विभागात १७ कोटीवर अधिक रक्कमेचा शिष्यवृत्ती घोटाळा उघडकीस आला.

बरगे यांच्यासह दोन लिपिकांना पुन्हा घेणार पोलीस ताब्यात
गडचिरोली : जिल्ह्यात समाज कल्याण विभाग व आदिवासी विकास विभागात १७ कोटीवर अधिक रक्कमेचा शिष्यवृत्ती घोटाळा उघडकीस आला. या प्रकरणात अटक करण्यात आलेले गडचिरोली येथील सामाजिक न्याय विभागाचे सहायक समाज कल्याण आयुक्त तुकाराम बरगे व सामाजिक न्याय विभागाच्या गडचिरोली येथील सहायक आयुक्त कार्यालयातील लिपीक विजय उकंडराव बागडे व आदिवासी विकास विभागातील वरिष्ठ लिपीक संजय दयानंद सातपुते यांचा जामिन अर्ज गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी रद्द केल्यामुळे या तिघांनाही गडचिरोली पोलीस पुन्हा गुरूवारी ताब्यात घेणार असल्याची माहिती या प्रकरणाचे विशेष तपास अधिकारी पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी दिली आहे.
गडचिरोली पोलिसांकडे शिष्यवृत्ती प्रकरणात १० वर अधिक प्रकरण दाखल आहे. आतापर्यंत १७ आरोपींना यात अटक करण्यात आली आहे. २२ फेब्रुवारी रोजी सहायक समाज कल्याण आयुक्त तुकाराम बरगे याला अटक करण्यात आली होती. तर २३ फेब्रुवारी रोजी विजय बागडे व संजय सातपुते या दोन लिपिकांना अटक झाली होती. त्यांची १४ दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत चंद्रपूर कारागृहात रवानगी करण्यात आली होती. या घोटाळा प्रकरणात पाच गुन्ह्यांमध्ये बरगे, बागडे, सातपुते यांचा जामिन न्यायालयाने रद्द केला आहे. गुरूवारी कोर्टाच्या परवानगीनंतर पोलीस चंद्रपूर कारागृहातून या तिघांना ताब्यात घेणार आहे. तर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी दिगांबर मेंडके यांच्या जामिन अर्जावर ३० मार्च रोजी सुनावणी होणार आहे. या प्रकरणात अनेक संस्थाचालक न्यायालयाने जामिन नाकारल्यानंतरही फरार असल्याने पोलीस त्यांच्या मागावरही फिरत आहे. (प्रतिनिधी)