शेतकऱ्यांच्या कर्जाचे उद्दिष्ट बँकांनी १०० टक्के पूर्ण करावे
By Admin | Updated: April 17, 2016 01:06 IST2016-04-17T01:06:14+5:302016-04-17T01:06:14+5:30
कृषी विभागाने शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी माहिती पत्रिका वितरित करून बँकेकडे प्रस्ताव पाठविण्याची माहिती ...

शेतकऱ्यांच्या कर्जाचे उद्दिष्ट बँकांनी १०० टक्के पूर्ण करावे
पालक सचिवांचे निर्देश : ‘ग्राम उदय से भारत उदय’चा घेतला आढावा
गडचिरोली : कृषी विभागाने शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी माहिती पत्रिका वितरित करून बँकेकडे प्रस्ताव पाठविण्याची माहिती शेतकऱ्यांना द्यावी व प्रत्येक बँकांनी दिलेले उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करावे, असे निर्देश बँकांच्या अधिकाऱ्यांना गडचिरोली जिल्ह्याचे पालकसचिव तसेच महसूल व वन विभागाचे सचिव विकास खारगे यांनी शनिवारी दिले. गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी बैठकीला जिल्हाधिकारी रणजितकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, मुख्य वनसंरक्षक पी. कल्याणकुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी महेश आव्हाड, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवणे, उपजिल्हाधिकारी जयंत पिंपळगावकर, उपवनसंरक्षक लक्ष्मी अनबत्तुला आदी उपस्थित होते.
यावेळी खारगे म्हणाले, संपूर्ण देशात ग्रामोदय से भारत उदय अभियान १४ ते १६ एप्रिल या कालावधीत राबविण्यात येत आहे. सर्व विभागांना या कालावधीत शासकीय योजनांच्या प्रसिध्दी व सोबतच ग्रामसभेत शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांची निवड करावी, जेणेकरून आर्थिक वर्षात उद्दिष्ट पूर्तता करण्यास अडचण निर्माण होणार नाही. ग्रामीण भागात सामाजिक समरसता, एकोपा वृध्दिंगत होण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी काम करावे, असे निर्देशही पालकसचिवांनी दिले. १ जुलै २०१६ रोजी राज्यात दोन कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. पर्यावरण रक्षण, जलसंवर्धन करण्याच्या दृष्टीने ही योजना असल्यामुळे सर्व शासकीय विभागांनी सहभाग घेऊन १ जुलैला वृक्षारोपण करावे व त्यासाठी महिन्यात जमीन निश्चित करून खड्डे तयार करावे, अशा सूचना खारगे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. बैठकीची सुरूवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मालार्पण करून करण्यात आली. प्रास्ताविक जिल्हाधिकारी रणजितकुमार तर आभार महेश आव्हाड यांनी मानले. (जिल्हा प्रतिनिधी)