वेतनवाढीच्या मागणीसाठी बँकांचा संप
By Admin | Updated: December 6, 2014 01:44 IST2014-12-06T01:44:11+5:302014-12-06T01:44:11+5:30
वेतनवाढीच्या मागणीसाठी बँक कर्मचाऱ्यांनी ५ डिसेंबर रोजी पुन्हा संप पुकारला. या संपामुळे नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.

वेतनवाढीच्या मागणीसाठी बँकांचा संप
गोंदिया : वेतनवाढीच्या मागणीसाठी बँक कर्मचाऱ्यांनी ५ डिसेंबर रोजी पुन्हा संप पुकारला. या संपामुळे नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. दुसरीकडे मात्र एटीएमवर पैसे काढणाऱ्यांची चांगलीच गर्दी दिसून आली. एकच दिवसाचा हा संप असून शनिवारपासून बँकांचा कारभार मात्र पूर्ववत सुरू होणार आहे.
राष्ट्रीयीकृत बँकांना वेतनवाढ देण्याचा निर्णय बँक व्यवस्थापकांच्या इंडियन बँक असोसिएशनद्वारे (आयबीए) घेतला जातो. या असोसिएशनशी वेतनवाढीबाबत चर्चा करण्यासाठी देशभरातील बँक कर्मचाऱ्यांच्या नऊ संघटनांनी युनायटेड फोरम आॅफ बँक युनियनची (यूएफबीयू) स्थापना केली आहे. यूएफभीयू व आयबीएमध्ये वेतनवाढीसंदर्भात दहावी द्विपक्षीय चर्चा सातत्याने निष्फळ होत आहे. त्यामुळेच कर्मचाऱ्यांत नाराजगी असून हे आंदोलन केले जात आहे.
या आंदोलनांतर्गत २ ते ५ डिसेंबर दरम्यान वेगवेगळ््या राज्यांत संप पाळण्यात आला. तर ठरविण्यात आल्यानुसार ५ डिसेंबर रोजी गोवा व महाराष्ट्रात हा संप पाळला जात आहे. त्यामुळे हा एक दिवसीय संप असून ६ डिसेंबरपासून बँकांचे कामकाज पूर्ववत सुरू राहणार आहे. विशेष म्हणजे या संपामुळे नागरिकांची चांगलीच पंचाईत झाली. (शहर प्रतिनिधी)