उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे बँक प्रगतीवर
By Admin | Updated: December 7, 2014 22:50 IST2014-12-07T22:50:28+5:302014-12-07T22:50:28+5:30
दुर्गम भाग, शैक्षणिक मागासलेपणा, पायाभूत सुविधांचा अभाव असे अनेक प्रश्न जिल्ह्यात कायम आहे. मात्र अशा विपरित परिस्थितीतही उत्कृष्ट बँकींग सेवा देऊन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने यंदा

उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे बँक प्रगतीवर
गडचिरोली : दुर्गम भाग, शैक्षणिक मागासलेपणा, पायाभूत सुविधांचा अभाव असे अनेक प्रश्न जिल्ह्यात कायम आहे. मात्र अशा विपरित परिस्थितीतही उत्कृष्ट बँकींग सेवा देऊन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने यंदा राज्यातून उत्कृष्ट जिल्हा सहकारी बँकेचा पुरस्कार मिळविला आहे. उत्कृष्ट व्यवस्थापनामुळेच जिल्हा बँक प्रगतीच्या शिखरावर पोहोचली आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी केले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आज रविवारला आयोजित उत्कृष्ट कार्यक्षमता पुरस्कार वितरण सोहळ्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, सचिव त्रियुगी नारायण दुबे, बँकेचे उपाध्यक्ष डॉ. बळवंत लाकडे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश आयलवार आदी मान्यवर उपस्थित होते. बँकींग सेवा क्षेत्र हे टीमवर्क आहे. या टीमला चांगला मार्गदर्शक लाभल्यामुळे जिल्हा बँकेची भरभराट होत आहे, असे गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. किर्तीवर्धन दीक्षित यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.
यावेळी प्रचिंत पोरेड्डीवार म्हणाले, जिल्हा बँकेच्या विकासात बँकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. जिल्हा बँकेची आणखी भरभराट होण्यासाठी येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समर्पित भावनेने काम करावे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी जिल्हा बँकेच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते शहरी भागातील आरमोरी, सिरोंचा, कुरखेडा येथील बँक शाखांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे उत्कृष्ट कार्यक्षमता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ग्रामीण भागातील धानोरा, आलापल्ली व अमिर्झा या तीन शाखांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या उत्कृष्ट कार्यक्षमता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच अतिदुर्गम विभागातील एटापल्ली, भामरागड, कसनसूर या शाखांना तसेच थकीत पीक कर्ज वसुली करणाऱ्या बँक निरिक्षकांना गौरविण्यात आले. प्रास्ताविक सतिश आयलवार, संचालन अरूण निंबेकर यांनी केले. (स्थानिक प्रतिनिधी)