कर्ज मेळाव्याला बँक अधिकाऱ्यांची दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2017 01:19 IST2017-07-05T01:19:19+5:302017-07-05T01:19:19+5:30
बँक आॅफ इंडिया कुरखेडा शाखेच्या वतीने तालुक्यातील पलसगड येथील गोटूल भवनात पीक कर्ज मेळावा मंगळवारी घेण्यात आला.

कर्ज मेळाव्याला बँक अधिकाऱ्यांची दांडी
पलसगड येथे आटोपले सोपस्कार : कंत्राटी कर्मचाऱ्याच्या उपस्थितीत मेळावा
लोकमत न्यूज नेटवर्क
पलसगड : बँक आॅफ इंडिया कुरखेडा शाखेच्या वतीने तालुक्यातील पलसगड येथील गोटूल भवनात पीक कर्ज मेळावा मंगळवारी घेण्यात आला. मात्र या मेळाव्याला बँकेचा एकही जबाबदार अधिकारी व कर्मचारी उपस्थित नव्हता. कंत्राटी कर्मचाऱ्याने शेतकऱ्यांना तुटपुंजी माहिती देऊन मेळाव्याचे सोपस्कार आटोपून घेतले. यामुळे पलसगड परिसरातील शेतकऱ्यांनी बँक प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली असून बँकेला केवळ पीक कर्ज मेळावा घेतल्याचा फार्स करायचा होता. असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
पलसगड परिसरातील गावे नक्षलग्रस्त व आदिवासी बहूल आहेत. या गावातील नागरिकांना पीक कर्जाविषयीची माहिती नाही. पलसगड येथे पीक कर्ज घेण्याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती उपलब्ध झाल्यानंतर पलसगडसह परिसरातील ग्रामीण भागातील जवळपास दीडशेच्या संख्येत शेतकऱ्यांनी उपस्थिती दर्शविली होती. या मेळाव्याला बँकेचे अधिकारी उपस्थित असणे आवश्यक होते. बँक व्यवस्थापकांनी महेंद्र ताटलाम व मोरेश्वर तिकम या दोघांची नियुक्ती मेळाव्यासाठी केली होती. महेंद्र ताटलाम हे बँकेचे अधिकारी आहेत. तर मोरेश्वर तिकम हे कंत्राटी कर्मचारी आहेत. प्रत्यक्ष मेळाव्यादरम्यान मोरेश्वर तिकम यांनी माहिती दिली. मात्र पीक कर्जाविषयची सविस्तर माहिती त्यांच्याकडे उपलब्ध नसल्याने एखाद्या शेतकऱ्याने प्रश्न उपस्थित केल्यास त्या प्रश्नाचे उत्तर त्यांना देता येत नव्हते. तुटपुंजी माहिती देऊन त्यांनी वेळ मारून नेली. अनेक शेतकऱ्यांना तर त्यांनी दिलेली माहिती समजली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा भ्रमनिराश झाला. मेळाव्याला पलसगडचे सरपंच उमाजी धुर्वे, तलाठी जांभुळकर, सचिव सराटे, तंमुस अध्यक्ष विश्वनाथ वट्टी यांच्यासह गावातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.
पीक कर्ज मेळावे केवळ फार्स
राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे प्रत्येक बँकेला पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मागील वर्षीपासून पीक कर्ज मेळावे घेणेही सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे बँका पीक कर्ज मेळावे घेतात. मात्र पीक कर्ज देण्याविषयी बँकेचा व बँकेच्या अधिकाऱ्यांचा सकारात्मक विचार नसल्याने ते यातून पळवाट शोधण्याचा प्रयत्न करतात. सक्तीचे केले म्हणून पीक कर्ज मेळावे घेण्याचे सोपस्कार बँकांच्या वतीने आटोपले जात आहेत.