बंडोपंत मल्लेलवार यांचे जि.प. सदस्यत्व रद्द
By Admin | Updated: November 26, 2014 23:05 IST2014-11-26T23:05:00+5:302014-11-26T23:05:00+5:30
नक्षल्यांना स्फोटके पुरविल्याच्या आरोपावरून वर्षभरापासून नागपूरच्या कारागृहात असलेले काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य बंडोपंत मल्लेलवार हे सलग वर्षभर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण

बंडोपंत मल्लेलवार यांचे जि.प. सदस्यत्व रद्द
गडचिरोली : नक्षल्यांना स्फोटके पुरविल्याच्या आरोपावरून वर्षभरापासून नागपूरच्या कारागृहात असलेले काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य बंडोपंत मल्लेलवार हे सलग वर्षभर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण व विशेष सभांना विनापरवानगीने गैरहजर राहिल्याने त्यांचे जिल्हा परिषद सदस्यत्व विभगीय आयुक्तांनी रद्द केले आहे़
नक्षल्यांना स्फोटके पुरविल्याप्रकरणी भामरागड पोलिसांनी २१ जून २०१३ रोजी बंडोपंत मल्लेलवार यांच्यासह सहा जणांवर गुन्हे दाखल केले होते़ त्यावेळी या प्रकरणातील चार जणांना पोलिसांनी अटक केली होती, तर एकाने न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवला होता़ मात्र, बंडोपंत मल्लेलवार यांनी काही कालावधीसाठी फरार झाल्यानंतर ७ आॅगस्ट २०१३ रोजी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले़ तेव्हापासून ते नागपूरच्या कारागृहात आहेत़
मल्लेलवार हे मौशीखांब-मुरमाडी गट क्रमांक-२० या जिल्हा परिषद क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करतात़ परंतु ८ जुलै २०१३ पासूनच्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभांना, ३० मे २०१३ पासूनच्या स्थायी समितीच्या सभांना व ३१ मे २०१३ पासून आरोग्य समितीच्या सभांना ते विनापरवानगीने गैरहजर राहिले़ महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम ८२(२)अन्वये एखादा सदस्य जिल्हा परिषदेच्या सभांना सहा महिने किंवा वर्षभर अनुपस्थित राहिल्यास तसेच विषय समित्यांच्या सभाना ३ महिने किंवा सहा महिने अनुपस्थित राहिल्यास त्याचे सदस्यत्व रद्द होते़ त्याअनुषंगाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम ४०(१) (ब) अन्वये मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्राची जागा रिकामी झाली किंवा कसे, याबाबत मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांना ११ जून २०१४ रोजी पत्र लिहिले होते़
या पत्राच्या अनुषंगाने विभागीय आयुक्तांनी ६ सप्टेंबर, २२ सप्टेंबर व २० आॅक्टोबर अशा तीन वेळा सुनावणी केली़ पहिल्या दोन तारखांना बंडोपंत मल्लेलवार यांच्या वतीने त्यांचे पुत्र राहुल मल्लेलवार उपस्थित होते़ त्यानंतरच्या सुनावणीला अॅड. कुणाल मुल्लमवार यांनी मल्लेलवार यांच्या वतीने काम पाहिले़ अॅड. मुल्लमवार यांनी मुदतवाढ मागून २९ आॅक्टोबरला लेखी निवेदन दिले़ त्यावर विभागीय आयुक्तांनी १३ नोव्हेंबर २०१४ रोजी अंतिम निर्णय देऊन बंडोपंत मल्लेलवार यांचे जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द केले आहे़ विभागीय आयुक्तांचा हा निर्णय मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या सहायक आयुक्तांना कळविला आहे़ आता लवकरच निवडणूक विभाग मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रासाठी पोटनिवडणूक घेईल, असे सांगितले जात आहे़
(जिल्हा प्रतिनिधी)