बांबू कामगारांचा तहसीलवर मोर्चा
By Admin | Updated: July 10, 2014 23:36 IST2014-07-10T23:36:17+5:302014-07-10T23:36:17+5:30
बांबू कामगारांना चांगल्या प्रतीच्या ५० हजार बांबूचा पुरवठा करावा, या मागणीसाठी बुरड संघटनेतर्फे तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यानंतर बांबू कामगारांच्या अनेक मागण्यांचे

बांबू कामगारांचा तहसीलवर मोर्चा
आरमोरी : बांबू कामगारांना चांगल्या प्रतीच्या ५० हजार बांबूचा पुरवठा करावा, या मागणीसाठी बुरड संघटनेतर्फे तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यानंतर बांबू कामगारांच्या अनेक मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
वनविभागाच्या कार्यालयासमोर १ जुलैपासून बुरड संघटनेतर्फे उच्च प्रतीचे बांबू मिळावे, या मागणीसाठी उपोषण सुरू करण्यात आले होते. परंतु प्रशासनाने उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याने बुधवारी संघटनेतर्फे तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. बुरड कामगारांना चांगल्या प्रतीचा बांबू मिळत नसल्याने बुरड समाजापुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. चांगल्या प्रतीच्या ५० हजार बांबूचा पुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी मागील दोन महिन्यापासून संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला जात होता. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केवळ आश्वासने दिली जात होती. त्यानंतर १ जुलैपासून वनविभागाच्या कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात आले. त्यानंतर बुधवारी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला.
आरमोरी, देसाईगंज तालुक्यातील बांबू कामगारांना बांबू लागवडीसाठी एक हेक्टर वनजमीन प्रत्येक कुटुंबाला देण्यात यावी, बांबू हस्तकला उद्योग व अगरबत्ती प्रकल्प सुरू करावे, सुशिक्षित बेरोजगार युवकांना वनविभागात काम द्यावे, बुरड समाजाच्या समाज मंदिरासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, बांबू वरील सर्व प्रकारचे कर रद्द करावे, आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार चन्नावार यांना दिले.
यावेळी मोर्चात भाजपचे प्रदेश सदस्य रविंद्र बावनथडे, भारत बावनथडे, सुनिल नंदवार, राहुल तितिरमारे, सावजी दुमाने, प्रमोद पेंदाम, मधुकर टिचकुले, बुरड समाजाचे अध्यक्ष मधुकर बोरकर, मधुकर हिरापुरे, हरीहर कापकर, छोटू चंदेल, जौंजालकर, संजय कत्रे, सुनिल बोरकर, नेपाल नागापुरे, शोभा नागपुरे, सुनिता नागपुरे, महेंद्र ठाकरे, रमावती हिरापुरे, हेमलता नागापुरे, वच्छला बोरकर, रोहिणी हिरापुरे, मंदा बोरकर, मंजू हिरापुरे आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)