पालिकेचे शिलकी अंदाजपत्रक मंजूर

By Admin | Updated: February 21, 2017 00:39 IST2017-02-21T00:39:11+5:302017-02-21T00:39:11+5:30

स्थानिक नगर पालिकेच्या सन २०१७-१८ या वर्षाच्या अंदाजपत्रकाला २० फेब्रुवारी रोजी सर्वानुमते मंजुरी प्रदान करण्यात आली.

The Balochi budget of the corporation is approved | पालिकेचे शिलकी अंदाजपत्रक मंजूर

पालिकेचे शिलकी अंदाजपत्रक मंजूर

गडचिरोली पालिकेत सभा : शहराच्या विकासासंदर्भात अंदाजपत्रकात विविध बाबींचा समावेश
गडचिरोली : स्थानिक नगर पालिकेच्या सन २०१७-१८ या वर्षाच्या अंदाजपत्रकाला २० फेब्रुवारी रोजी सर्वानुमते मंजुरी प्रदान करण्यात आली. स्वत:च्या महसुलातून नगर परिषदेला २६ कोटी ३४ लाख ६१ हजार ५०६ रूपयांचे तर शासकीय अनुदानातून ३० कोटी ७२ लाख ९२ हजार ४६१ रूपयांचे महसूल प्राप्त होणार आहे. दोन्ही बाबीतून खर्च वजा जाता नगर परिषदेकडे ५ लाख ७८ हजार ९६७ रूपये शिल्लक राहणार आहेत.
नगर परिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर पहिल्यांदाच सभा घेऊन नगर परिषदेचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. सदर अर्थसंकल्पीय सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष योगीता पिपरे होत्या. यावेळी उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, बांधकाम सभापती आनंद श्रृंगारपवार, पाणी पुरवठा सभापती केशव निंबोळ, सभापती अ‍ॅड. नितीन उंदीरवाडे, गुलाब मडावी, मुख्याधिकारी कृष्णा निपाने यांच्यासह इतर नगरसेवक उपस्थित होते.
नगर परिषदेत सोमवारी मांडलेल्या अंदाजपत्रकानुसार नगर परिषदेला विविध करांच्या माध्यमातून २० कोटी १२ लाख ४१ हजार ५०० रूपयांचा महसूल जमा होणार आहे. २०१७-१८ या वर्षातील आरंभीची शिल्लक म्हणून ६ कोटी २२ लाख २० हजार रूपये शिल्लक आहे. महसुली जमा व प्रारंभीची शिल्लक मिळून पालिकेकडे एकूण २६ कोटी ३४ लाख ६१ हजार ५०६ रूपये जमा होतील. सन २०१७-१८ चा महसुली खर्च २६ कोटी ३० लाख ९५ हजार रूपयाची तरतूद अंदाजपत्रकात ठेवण्यात आली आहे. ३ लाख ६६ हजार ५०६ रूपये शिल्लक राहतील.
शासनाकडून नगर परिषदेला दरवर्षी विविध प्रकारच्या योजनांवर अनुदान मिळते. २०१७-१८ या वर्षात नगर परिषदेला शासनाकडून एकूण १६ कोटी १५ लाख रूपयांचे अनुदान मिळेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. मागील वर्षी शासनाकडून प्राप्त झालेला मात्र खर्च न झालेला १६ कोटी १५ लाख रूपयांचा निधी शिल्लक आहे. दोन्ही मिळून नगर परिषदेकडे ३० कोटी ७२ लाख ९२ हजार ४६१ रूपये जमा होणार आहे. त्यातून ३० कोटी १७ लाख ८० हजार रूपये खर्चून २ लाख १२ हजार ४६१ रूपये शिल्लक राहणार आहेत. (नगर प्रतिनिधी)

अपंगांसाठी अर्थसंकल्पात पाच लाखांची तरतूद
गडचिरोली नगर पालिकेच्या दरवर्षीच्या वार्षिक अंदाजपत्रकात तीन टक्क्यानुसार अपंगांना कुबड्या, ट्रायसीकल आदी साहित्य वाटपासाठी तीन ते पाच लाख रूपयांची तरतूद केली जाते. गतवर्षीच्या सन २०१६-१७ च्या अंदाजपत्रकात पाच लाखांची तरतूद यासाठी करण्यात आली होती. मात्र सदर मुद्यावर चर्चा झाल्यावर अपंग विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अपंगासाठीचा निधी आजवर कधीही खर्च करण्यात आला नाही, असे सभेत सांगितले. केवळ त्याची तरतूद होत असते, अंमलबजावणी होत नाही, असे स्पष्ट झाले. यावर यंदाच्या अंदाजपत्रकात तरतुदीनुसार शहरातील अपंगांना वरील साहित्याचा लाभ आर्वजून द्यायचे, असे या सभेत ठरविण्यात आले.

शिक्षण विभागासाठी १ कोटी ४० लाखांची तरतूद
दिवसेंदिवस नगर पालिकांच्या शाळांचा दर्जा घसरत चालला आहे. त्यामुळे शहरातील पालकवर्ग नगर परिषदेच्या शाळांकडे पाठ फिरवित असल्याचे दिसून येत आहे. परिणामी या शाळांची पटसंख्या घटत चालली आहे. या शाळांना पुनर्जीवित करण्यासाठी नगर परिषदेने पहिल्यांदाच शिक्षण विभागावर सुमारे १ कोटी ४० लाख रूपयांची तरतूद केली आहे. या निधीतून नगर परिषद शाळेला वाल कंपाऊंड करणे, शाळेची दुरूस्ती करणे, वर्गखोल्या बांधणे व शाळेमध्ये डिजीटल उपकरणे बसविण्यासाठी १ कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत. नगर परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश बूट, दप्तर व इतर साहित्य पुरविण्यासाठी २० लाख रूपयांचा निधी, सर्वच शाळांना रंगरंगोटी करण्यासाठी १० लाख रूपये व प्रत्येक शाळेला अग्नीशमन यंत्र खरेदी करून देण्यासाठी १० लाख रूपये असे एकूण १ कोटी ४० लाख रूपयांची तरतुद करण्यात आली आहे.

धानोरा मार्गावर बगिचा निर्माण होणार
धानोरा मार्गावरील बसस्थानकानजीक असलेल्या तलावात बगिचाची निर्मिती केली जाणार आहे. बगिचाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याला नगररचनाकार यांच्याकडून परवानगी नंतर कामाचे अंदाजपत्रक तयार केले जाणार आहे. त्यानंतर सदर प्रस्ताव तांत्रिक व प्रशासकीय मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला जाणार आहे.

हनुमान व नेहरू वार्डात पाण्याची टाकी उभारण्यासाठी २ कोटी रूपये खर्चून पाणी टाकली बांधली जाईल. सदर प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविला जाणार आहे. याचबरोबर शहरात बोअरवेलचे खोदकाम व दुरूस्तीकरिता सात लाख रूपये, पाण्याची नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी १० लाख रूपये, सार्वजनिक विहिरींची साफसफाई करण्यासाठी १ लाख रूपये वाढीव पाणी पुरवठा योजनेकरिता घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी १ कोटी रूपये, फिल्टर प्लान्टवर मोटारपंप खरेदीसाठी १५ लाख रूपये, फिनाईल, मलेरिया आॅईल व बीएससी पॉवर खरेदीसाठी पाच लाख रूपये, आठवडी बाजारातील ओटे व मटन मार्केटचा परिसर दुरूस्त करण्यासाठी १० लाख रूपये, नगरोद्यान सौंदर्यीकरणाकरिता १५ लाख रूपये, ओपन स्पेसच्या विकासाकरिता ५० लाख रूपये व शहरातील जुने रस्ते व नाल्यांच्या दुरूस्तीसाठी ५० लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत.

शहराच्या सर्वांगिण विकासाला मध्यनजर ठेवून अंदाजपत्रक तयार करण्यात आला आहे. नगर परिषदेच्या शाळांमध्ये गरीबाची मुले शिकतात. त्यांनाही कॉन्व्हेंटप्रमाणे दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी आपण संपूर्ण नगर परिषदेच्या शाळांचा कायापालट करण्यासाठी सुमारे १ कोटी ४० लाख रूपये मंजूर केले आहेत. आजपर्यंत शिक्षण विभागासाठी मंजूर झालेली सर्वोच्च रक्कम आहे. त्याचबरोबर शहरातील नागरिकांसाठी अत्यावश्यक बाबी लक्षात घेऊन त्यांना प्रथम प्राधान्य देत अंदाजपत्रकामध्ये त्या बाबींसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.
- योगीता प्रमोद पिपरे, नगराध्यक्ष, नगर परिषद गडचिरोली

Web Title: The Balochi budget of the corporation is approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.