नक्षलग्रस्त भागात बॅलेट सज्ज
By Admin | Updated: April 23, 2015 01:21 IST2015-04-23T01:21:54+5:302015-04-23T01:21:54+5:30
गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण गडचिरोली भागातील अहेरी उपविभागात २४ एप्रिल रोजी अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली या तालुक्यात ग्रामपंचायत ...

नक्षलग्रस्त भागात बॅलेट सज्ज
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण गडचिरोली भागातील अहेरी उपविभागात २४ एप्रिल रोजी अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली या तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. याकरिता कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून पोलिंग पार्ट्या मतदान केंद्रावर जाण्यासाठी बेसकॅम्पवर रवाना झाल्या आहेत.
एटापल्ली, भामरागड, सिरोंचा व अहेरी या चार नक्षलप्रभावीत तालुक्यांमध्ये २४ एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे. या चार तालुक्यांमधील ७० ग्राम पंचायतींपैकी १४ ग्राम पंचायतींमध्ये नक्षल्यांच्या भीतीने नागरिकांनी उमेदवारी अर्जच दाखल केला नाही. उर्वरित ५६ ग्राम पंचायतींमध्ये एक हजार ३०५ उमेदवार रिंगणात आहेत.
अहेरी तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीतील ७२ प्रभागासाठी १८१ सदस्य निवडावयाचे आहेत. २१ ग्रामपंचायतीत ५० हजार ६८० मतदार आहेत. यात २४ हजार ७९५ पुरूष तर २४ हजार ७८५ स्त्री मदतार आहेत. अहेरी तालुक्यात एकूण ५२२ उमेदवार निवडणुकीसाठी पात्र झाले.
सध्याच्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण ८३ मतदान केंद्र असून यासाठी ९० ईव्हीएम मशीनची गरज आहे आणि १० टक्के ईव्हीएम मशीन आरक्षित ठेवण्यात येणार आहे. जवळपास १५० बॅलेट युनिट उपलब्ध आहे. प्रत्येक मतदान केंद्रासाठी एक केंद्र अधिकारी, तीन मतदान अधिकारी कार्यरत राहणार आहे. अतिरिक्त १० टक्के कर्मचारी आरक्षित आहेत. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी ३६० ते ३७० कर्मचारी कर्तव्यावर राहतील. तालुक्यात ८३ मतदान केंद्रापैकी आठ मतदान केंद्र अतिसंवेदनशिल आहे. त्यात येलचील, चिंतलपेठ, तिमरन, गुड्डीगुडम, मेडपल्ली, कोरेली बु., चंद्रा, गोविंदगाव यांचा समावेश आहे आणि ४८ मतदान केंद्र संवेदनशिल आहे. २७ मतदान केंद्र साधारण आहे. या तालुक्यात चार बेस कॅम्पही तयार करण्यात आले आहे. यामध्ये अहेरी, जिमलगट्टा, राजाराम, पेरमिली यांचा समावेश आहे. येथूनच पोलिंग पार्ट्या पुढे पाठविल्या जाणार आहे.
एटापल्ली तालुक्यातील एटापल्ली, उडेरा, गेदा, गुरूपल्ली, येमली, सोहगाव, जारावंडी, बुर्गी, दिवडी या नऊ ग्राम पंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. या नऊ ग्राम पंचायतींमध्ये नऊ हजार ८१२ स्त्री तर १० हजार २६८ पुरूष मतदार आहेत. या सर्वच ग्राम पंचायती नक्षलप्रभावी क्षेत्रामध्ये मोडतात.
एका ग्राम पंचायतीमध्ये पाच ते सहा गावांचा समावेश आहे. प्रत्येक गावाचे अंतर चार ते पाच किमी आहे. नागरिकांना एवढ्या दूर अंतर चालत येऊन मतदान करण्याची पाळी येऊ नये, यासाठी निवडणूक विभागाने गावनिहाय ३६ मतदान केंद्र निर्माण केले आहेत. या प्रत्येक मतदान केंद्रावर निवडणूक निर्णय अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना निवडणुकीबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहिती एटापल्लीचे तहसीलदार संपत खलाटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. या तालुक्यातही कडेकोट पोलीस बंदोबस्त मतदानादरम्यान राहणार आहे. बेस कॅम्पवरून पोलिंग पार्ट्या बुधवारी रवाना करण्याचे काम सुरू करण्यात आले.
सिरोंचा तालुक्यात मुख्यालयाच्या ग्रामपंचायतसह अन्य २४ ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. पोलिंग पार्ट्यांना साहित्याचे वाटप करून बेसकॅम्पकडे रवाना करण्यात आले आहे. येथेही नक्षलप्रभावित भागात मतदान असल्याने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पार्ट्याही बंदोबस्ता रवाना होतील. (जिल्हा प्रतिनिधी)