आष्टीतील ब्रिटिशकालीन विश्रामगृह झाले बकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:36 IST2021-04-18T04:36:55+5:302021-04-18T04:36:55+5:30
सुधीर फरकाडे आष्टी : इंग्रज अधिकाऱ्यांनी बांधलेल्या व त्यांच्या पसंतीचे असलेले आष्टी येथील विश्रामगृह बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे आता ...

आष्टीतील ब्रिटिशकालीन विश्रामगृह झाले बकाल
सुधीर फरकाडे
आष्टी : इंग्रज अधिकाऱ्यांनी बांधलेल्या व त्यांच्या पसंतीचे असलेले आष्टी येथील विश्रामगृह बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे आता बकाल झालेले आहे. त्यामुळे विश्रामगृहाचा परिसर आता भकास झाला आहे.
आष्टी शहराचे महत्व ओळखून इंग्रजांनी वैनगंगा नदीच्या किनाऱ्यावर आकर्षक असे विश्रामगृह बांधले. इंग्रज राजवटीत या विश्रामगृहात इंग्रज अधिकाऱ्यांचा राबता राहत होता. इंग्रज राजवट संपल्यानंतर सदर विश्रामगृह हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आले. या ठिकाणी बांधकाम विभागाकडून अभियंता, चपराशी व खानसामा यांचेसाठी निवासस्थान बांधण्यात आले. याठिकाणी अभियंते राहत होते. या विश्रामगृहात अनेक सोयीसुविधा करण्यात आल्या होत्या. मुलांसाठी खेळणी, सुंदर असा बगीचा, विविध फुलांची झाडे, बसायला लॉन तयार करण्यात आले होते. त्यामुळे नदीच्या किनाऱ्यावर असलेले हे विश्रामगृह पर्यटकांचे आकर्षण बनले होते. या ठिकाणी सरकारी अधिकारी यांचे मुक्काम, राज्य सरकारमधील अनेक मंत्री महोदय यांची भेट या विश्रामगृहाला होत होती व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकी, पत्रकार परिषद आदी होत होत्या. त्यामुळे नेहमी रेलचेल असायची आता मात्र ते सर्व वैभव लयास गेले आहे. येथील अभियंता नंतर वास्तव्यास राहत नव्हते. चतुर्थ कर्मचारी निवृत्त झाले. त्यामुळे बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत गेले. आता येथील संरक्षक भिंत पडली, त्याठिकाणी असलेली लोखंडी ग्रील गायब झाल्या, मुलांसाठी असलेली खेळणी नाही, सर्वत्र झाडे वाळून गेली. बांधकाम विभागाने याकडे आतातरी लक्ष देण्याची गरज आहे. नाहीतर एकेकाळी पर्यटकांचे आकर्षण असलेले हे विश्रामगृह लयास यायला वेळ लागणार नाही.