विविध प्रकारचे स्वर निघणाऱ्या बाजागडचे भाविकांना आकर्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 01:06 IST2018-03-29T01:05:43+5:302018-03-29T01:06:01+5:30
धानोरा तालुक्यातील कुलभट्टी गावाजवळ बाजागड पहाड आहे. या पहाडावर असलेल्या दगडांमधून विविध प्रकारचे आवाज निघतात.

विविध प्रकारचे स्वर निघणाऱ्या बाजागडचे भाविकांना आकर्षण
बाळकृष्ण बोरकर।
ऑनलाईन लोकमत
मुरूमगाव : धानोरा तालुक्यातील कुलभट्टी गावाजवळ बाजागड पहाड आहे. या पहाडावर असलेल्या दगडांमधून विविध प्रकारचे आवाज निघतात. या दगडांची गोंड समाजातील आदिवासी नागरिकांच्या धार्मिक भावना जुळल्या आहेत. यावर्षी ३१ मार्च रोजी या ठिकाणी जत्रेचे आयोजन केले आहे.
मुरूमगावपासून कुलभट्टी हे गाव सहा किमी अंतरावर आहे. याच गावाच्या उत्तर-पूर्र्वेला दीड किमी अंतरावर बाजागड पहाड आहे. जवळपास एक हजार फुट उंचीवर अगदी शेवटच्या टोकावर २० फुट आकाराचा दगड आहे. या दगडाला छोट्या दगडाने वाजविल्यास एक वेगळाच स्वर निघतो. हे सुद्धा एक आश्चर्य आहे. गोंड समाजाचा धर्मगुरू पहांदीपारी कुपारलिंगो याच पहाडावर १८ वाद्य एकाचवेळी वाजविले होते, अशी येथील लोकांची धारणा आहे. वाद्याला ग्रामीण भागामध्ये वाजा असे संबोधले जाते. त्याच्या अपभ्रंशावरूनच बाजा हा शब्द बनला आहे. अनेक प्रकारचा आवाज निघत असल्यानेच या पहाडाला बाजागड असे संबोधले जात असावे, अशी एक मान्यता आहे.
दरवर्षी चैत्र पौर्णिमेला या पहाडावर जत्रा भरते. या जत्रेला छत्तीसगड, मध्यप्रदेश, महाराष्टÑ, तेलंगणा राज्यातील अनेक आदिवासीबांधव उपस्थिती दर्शवितात. पहाडावर चढण्यासाठी रस्ता नसल्याने भाविकांना खुप त्रास सहन करावा लागतो. पहाडावर पाण्याची सुविधा सुद्धा नाही. पहाडाच्या खाली मात्र बाराही महिने वाहणारा झरा आहे. हा झराच येथील भाविकांची तहाण भागविते. शासनाने या पहाडावर चढण्यासाठी पायºया बांधून द्याव्या, अशी मागणी भाविकांकडून होत आहे. मात्र याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे.