बाबासाहेबांंनी पदस्पर्श केलेल्या सर्व भूमींचा विकास करणार
By Admin | Updated: April 10, 2016 01:38 IST2016-04-10T01:38:11+5:302016-04-10T01:38:11+5:30
बाबासाहेबांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांचे लंडन येथील घर महाराष्ट्र शासनाने खरेदी केले. इंदू मिलच्या जागेवर भव्य वास्तू निर्माणाची आधारशिला ठेवण्यात आली आहे.

बाबासाहेबांंनी पदस्पर्श केलेल्या सर्व भूमींचा विकास करणार
१२५ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम : राजकुमार बडोले यांचे प्रतिपादन
कुरखेडा : बाबासाहेबांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांचे लंडन येथील घर महाराष्ट्र शासनाने खरेदी केले. इंदू मिलच्या जागेवर भव्य वास्तू निर्माणाची आधारशिला ठेवण्यात आली आहे. बाबासाहेबांच्या न्याय, समता व बंधुता या विचारांची बैठक मनामनात व घराघरात रुजविण्यासाठी महाराष्ट्रात ज्या-ज्या भूमीवर बाबासाहेबांचा पदस्पर्श झाला. त्यात सर्व भूमीचा विकास करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्धार आहे, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. या अंतर्गत कुरखेडा येथे शुक्रवारी रात्री ८ वाजता झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अनिरूध्द वनकर यांच्या दूत समतेचा हा आंबेडकरी जलसा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ना. राजकुमार बडोले बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विधान परिषदेचे सदस्य आमदार जोगेंद्र कवाडे, आमदार क्रिष्णा गजबे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवन नाट, जि.प. सदस्य अशोक इंदुरकर, पं.स. सदस्य चांगदेव फाये, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त विनोद मोहतुरे आदी उपस्थित होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार जोगेंद्र कवाडे म्हणाले की, देशाची एकात्मता आणि अखंडता अबाधित ठेवून १२५ कोटी जनतेला न्याय, समता व बंधुत्वाची वागणूक देत लोकशाही मूल्य बळकट करणाऱ्या व सर्वांना समान जगण्याचा अधिकार देणाऱ्या राज्य घटनेच्या मूल्याची जपवणूक सर्वांनी करावी, असे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर अनिरूध्द वनकर यांच्या कार्यक्रमाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झालेत. या कार्यक्रमाला आरमोरी विधानसभा क्षेत्रातील अनेक गावातून बौध्द बांधव व बाबासाहेबांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)