अहेरीला चौथ्यांदा मिळाले राज्यमंत्रिपद
By Admin | Updated: December 6, 2014 01:31 IST2014-12-06T01:31:39+5:302014-12-06T01:31:39+5:30
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदार संघाला चौथ्यांदा राज्यमंत्री पदाची संधी भाजपचे विद्यमान आमदार अम्ब्रीशराव महाराज यांच्या समावेशाने मिळाली आहे.

अहेरीला चौथ्यांदा मिळाले राज्यमंत्रिपद
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदार संघाला चौथ्यांदा राज्यमंत्री पदाची संधी भाजपचे विद्यमान आमदार अम्ब्रीशराव महाराज यांच्या समावेशाने मिळाली आहे.
अहेरी विधानसभा मतदार संघातून यापूर्वी १९९० मध्ये सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रीमंडळात धर्मरावबाबा आत्राम हे काँग्रेस पक्षाकडून राज्यमंत्री राहिलेत. त्यानंतर दोनवेळा धर्मरावबाबा आत्राम यांना राज्यमंत्री पदाची संधी मिळाली. एकवेळा ते अपक्ष म्हणून तर दुसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यमंत्री होते. त्यांनी अनेक महत्त्वाच्या खात्याचे काम राज्यमंत्री म्हणून पाहिलेले आहे. त्यानंतर आता पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आल्याबरोबर अम्ब्रीशराव सत्यवानराव आत्राम यांना राज्यमंत्री पदाची लॉटरी भाजपच्या कोट्यातून लागली. अहेरी हा तसा राजघराणांच्या आत्रामांचा कायम वर्चस्व असलेला मतदार संघ आहे. यापूर्वी येथून राजे विश्वेश्वरराव महाराज, राजे सत्यवानराव महाराज आमदार राहिले. परंतु या दोघांनाही मंत्री पदाची संधी मिळाली नाही. यावेळी पहिल्यांदा निवडून येऊनही अम्ब्रीशराव महाराज यांना मंत्री पदाची संधी मिळाली आहे. कट्टर विदर्भवादी अशी प्रतिमा असलेले अम्ब्रीशराव महाराज हे नाग विदर्भ आंदोलन समितीचे केंद्रीय अध्यक्ष म्हणूनही काम पाहत आहेत. नाविसची धूरा सांभाळताना लोकसभा निवडणुकीत अम्ब्रीशराव महाराज यांनी वर्धा येथे नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेत भारतीय जनता पक्षाला पाठींबा जाहीर केला होता. त्यानंतर ते स्वत: भाजपच्या तिकीटावर विधानसभेची निवडणूक अहेरी मतदार संघातून लढलेत व त्यांनी १९ हजारावर अधिक मतांनी विजयी झाले. भाजपाच्या तिकीटावर निवडून आलेले अम्ब्रीशराव महाराज यांचे जिल्ह्यात भाजपशी फारसे सौख्याचे संबंध नाहीत. भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्यातील अनेक नेत्यांशी त्यांचे मतभेद उघडपणे आहेत. भाजपला कोणत्याही कार्यक्रमात ते अहेरी विधानसभा क्षेत्रात प्रोजेक्ट करीत नाही, अशी दबक्या आवाजात चर्चा आहे.
आजोबांचा विसर
आज शपथ घेताना अम्ब्रीशराव महाराज यांनी आपले वडील राजे सत्यवानराव महाराज यांचा उल्लेख केला. मात्र श्रीमंत राजे विश्वेश्वरराव महाराज यांच्या उल्लेखाचा अम्ब्रीशरावांना विसर झाला, अशी प्रतिक्रीया सोशल मीडियावर उमटली आहे.