आझाद गणेश मंडळातर्फे दुष्काळग्रस्तांना एक लाखाची मदत
By Admin | Updated: September 23, 2015 05:19 IST2015-09-23T05:19:45+5:302015-09-23T05:19:45+5:30
अहेरीच्या आझाद गणेश मंडळाने रोषणाई व इतर खर्च कपात करीत राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक लाख

आझाद गणेश मंडळातर्फे दुष्काळग्रस्तांना एक लाखाची मदत
अहेरी : अहेरीच्या आझाद गणेश मंडळाने रोषणाई व इतर खर्च कपात करीत राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीकरिता दिले आहे. गडचिरोलीचे जिल्हाधिकारी रणजितकुमार यांच्याकडे मंगळवारी एका कार्यक्रमात मंडळाच्या वतीने धनादेश सोपविण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी रणजितकुमार होते. तर प्रमुख अतिथी म्हणून अहेरीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश धुमाळ, तहसीलदार सुरेश पुप्पलवार, पोलीस निरीक्षक संजय मोरे होते.
यावर्षी राज्यावर दुष्काळाचे संकट मोठे असल्याने सामाजिक बांधिलकी जपत अहेरीच्या आझाद गणेश मंडळाने रोषणाई व डेकोरेशनसाठीच्या खर्चात कपात केली. तो निधी एकत्रित करून राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला. अहेरी येथे मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी मंडळाचे कौतुक करून आझाद गणेश मंडळाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे स्वप्न साकार केल्याचे सांगितले. तर अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रणव अशोक यांनी आज सर्वजण डेकोरेशन, ड्रिंक आणि डिजे यावर भर देतात. परंतु या मंडळाने शेतकऱ्यांप्रती आपले सामाजिक दायित्व जोपासल्याचे ते म्हणाले.
अहेरीच्या बबलू हकीम यांनी आपल्या कुटुंबाच्या वतीने आझाद गणेश मंडळाला आर्थिक मदत दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे सदस्य अमोल मुक्कावार यांनी केले. तर संचालन गिरीश मद्देलार्वार व आभार अक्षय येन्नमवार यांनी मानले.
पुरस्काराची रक्कम शेतकऱ्यांना
याप्रसंगी आझाद गणेश मंडळातर्फे अहेरी येथील चाणक्य स्पर्धा परीक्षा केंद्राला १० हजाराची मदत तसेच अहेरी येथील वैकुंठ रथाच्या किरकोळ दुरुस्तीसाठी १० हजार रुपये देण्यात आले. आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रवीण पुल्लुरवार यांनी आपल्या पुरस्कारातून शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत केली याकरिता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.