अवलिया साकारतो कोळशाने हुबेहुब चित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 23:17 IST2019-06-22T23:16:33+5:302019-06-22T23:17:45+5:30
चार वर्ग शिकून अक्षर ओळख असलेला डोंगरगाव येथील माधव वानोशा कुमरे हा देवीदेवता, व्यक्ती व इतर निसर्गसौंदर्याचे चित्र कोळशाच्या सहाय्याने अगदी पाच मिनिटात हुबेहुब रंगवतो.

अवलिया साकारतो कोळशाने हुबेहुब चित्र
संडे अँकर । अनेकांच्या घरावर दिसते कलाकृती; चित्रांनी निर्माण केली स्वत:ची ओळख
प्रदीप बोडणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : चार वर्ग शिकून अक्षर ओळख असलेला डोंगरगाव येथील माधव वानोशा कुमरे हा देवीदेवता, व्यक्ती व इतर निसर्गसौंदर्याचे चित्र कोळशाच्या सहाय्याने अगदी पाच मिनिटात हुबेहुब रंगवतो. त्याच्याकडे असलेल्या अप्रतिम चित्रकलेच्या गुणाला व्यावसायिक दृष्टिकोन देता आला नाही. त्यामुळे तो परिस्थितीने अतिशय गरीब आहे. तरीही त्याने त्याच्या परिसरात माधव पेंटर अशी ओळख निर्माण केली आहे. जुनी सायकल, डोक्यावर टोपी घातलेला माधव गावात येताच माधव पेंटर आला रे, असा शब्द आपसूकच नागरिकांच्या तोंडातून निघते.
गरीब परिस्थितीत जन्मून मोठा झालेल्या माधवने चित्रकला शिकण्याचे कोणाकडूनही धडे घेतले नाही. चित्र निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेले महागडे साहित्य सुध्दा तो खरेदी करू शकला नाही. कोळशाच्या भरवशावर त्याने चित्रकलेचे वेड सांभाळले आहे. माधव हा अतिशय चांगले चित्र काढत असल्याने घराची एखादी भिंत रिकामी असल्यास त्यावर चित्र काढून देण्याचा आग्रह नागरिक करतात. आग्रहाखातर माधव घरमालक जो चित्र म्हणेल, तो चित्र हुबेहुब भिंतीवर रेखाटतो. विशेष म्हणजे, चित्र रेखाटण्यासाठी एखाद्या व्यक्तीने पाच-पन्नास रुपये हातावर ठेवले तर ठिक, नाही तर पैसे न विचारताच पुढे निघून जातो. मात्र चित्र काढण्यापूर्वी एका चित्राचे २० रुपये लागतील, असा टोला चित्र काढून मागणाऱ्याला अवश्य लगावतो.
माधवच्या चित्रकलेने परिसरातील नागरिकांना मोहून टाकले आहे. डोंगरगाव परिसरात एखाद्याच्या घरावर कोळशाने काढलेले चित्र दिसून आल्यास ते चित्र माधवनेच काढले आहे, असे विश्वासपूर्ण परिसरातील नागरिक सांगतात. एवढी ओळख माधवच्या चित्रकलेने निर्माण केली आहे. चित्रकलेत माधव एवढा निपून आहे की, कोळशाने एकदा मारलेली रेषा पुन्हा पुसण्याची गरज पडत नाही. डोळ्याची पापनी व त्यावर काढलेले केस यामध्ये तसूभरही फरक जाणत नाही.
माधवला नाटक व तमाशाचेही आहे वेड
माधवला चित्रकलेबरोबरच नाटक, तमाशाचेही वेड आहे. आरमोरी तालुक्यात कुठेही नाटक व तमाशा असला तिथे माधवची उपस्थिती अवश्य दिसून येते. नाटक व तमाशात संगीत साथ देणाºया व्यक्तींजवळची जागा ही माधवची ठरलेली जागा आहे.