अनुदानाची प्रतीक्षा
By Admin | Updated: August 3, 2016 02:04 IST2016-08-03T02:04:48+5:302016-08-03T02:04:48+5:30
आंतरजातीय विवाह केल्यास संबंधित जोडप्यांना ५० हजार रूपये अनुदान देण्याची योजना आहे.

अनुदानाची प्रतीक्षा
आंतरजातीय विवाह योजना : ५५ जोडपे आर्थिक अडचणीत
गडचिरोली : आंतरजातीय विवाह केल्यास संबंधित जोडप्यांना ५० हजार रूपये अनुदान देण्याची योजना आहे. या योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत यंदा सन २०१६-१७ वर्षात आंतरजातीय विवाह करणाऱ्या ५५ जोडप्यांना पात्र ठरविण्यात आले. मात्र या जोडप्यांना अद्यापही अनुदानाची ५० हजार रूपये रक्कम मिळाली नाही. जि. प. च्या समाजकल्याण विभागाकडे शासनाकडून निधी प्राप्त झाला असला तरी कार्यवाहीत दिरंगाई होत असल्याचे दिसून येते.
जाती-जातीतील भेदभाव नष्ट करून सामाजिक सलोखा व दोन वेगवेगळ्या संवर्गात समानता निर्माण करण्याच्या उद्देशाने शासनाने आंतरजातीय विवाहीत जोडप्यांना प्रोत्साहनपर अर्थसहाय्य देण्याची योजना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत कार्यान्वित केली आहे. या योजनेची अंमलबजावणी गेल्या अनेक वर्षांपासून जि. प. च्या समाजकल्याण विभागामार्फत सुरू आहे. वाढत्या नागरिकरणामुळे व शिक्षणामुळे आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी आंतरजातीय विवाह करणाऱ्या संबंधित जोडप्यांना आवश्यक त्या पुराव्यासह व कागदपत्रांनिशी जि. प. च्या समाजकल्याण विभागात रितसर अर्ज करावा लागतो. त्यानंतर पडताळणी करून संबंधित जोडप्याला पात्र केले जाते. (स्थानिक प्रतिनिधी)