नोकरीत रूजू करण्यास टाळाटाळ
By Admin | Updated: March 4, 2017 01:19 IST2017-03-04T01:19:58+5:302017-03-04T01:19:58+5:30
वनरक्षक भरतीत निवड होऊनही वन विभाग रूजू करून घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप निवड

नोकरीत रूजू करण्यास टाळाटाळ
आत्मदहनाचा इशारा : मागील तीन वर्षांपासून वन विभागाकडून दिरंगाई
गडचिरोली : वनरक्षक भरतीत निवड होऊनही वन विभाग रूजू करून घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे. वन विभागाने नोकरीत रूजू करून घ्यावे, अन्यथा वन विभागाच्या कार्यालय परिसरात आत्मदहन करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी निवड झालेल्या युवकांनी केली आहे.
देसाईगंज तालुक्यातील पोटगाव येथील विशाल शंकर दडमल हा २०१४-१५ च्या भरतीत पात्र ठरला. कुरखेडा तालुक्यातील उराडी येथील प्रकाश जनार्धन गरमळे हा २०१५-१६ च्या भरतीत पात्र ठरला. तर कुरखेडा तालुक्यातील सोनेरांगी येथील बबलू विजय वाघाडे व देविका अशोक गजबे हे डिसेंबर २०१६ मध्ये घेतलेल्या वनरक्षक पदाच्या भरतीत पात्र ठरले. शासनाच्या १२ डिसेंबर २०११ च्या शासन निर्णयानुसार ज्या उमेदवाराकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही. अशा उमेदवाराला नियुक्ती दिली जाते. त्यानंतर तीन महिन्याने सदर उमेदवाराने जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर केल्याची पोचपावती द्यावी लागते. या नियमानुसारच महाराष्ट्रात सर्वत्र तसेच गडचिरोली जिल्ह्यात पोलीस विभाग, जिल्हा परिषद व इतर विभागाच्या मार्फतीने नोकरीसाठी नियुक्ती दिली जात आहे. मात्र या चार युवकांना वन विभाग नियुक्ती देण्यास टाळाटाळ करीत आहे.
तीन वर्षापासून निवड होऊनही नियुक्ती न मिळाल्याने युवक कमालीचे त्रस्त झाले आहेत. नियुक्ती देण्याबाबत अनेकवेळा मुख्य वनसंरक्षकांना निवेदन देण्यात आले. मात्र नियुक्ती देण्यास त्यांच्याकडून टाळाटाळ होत आहे. त्यामुळे सदर युवक मानसिकदृष्ट्या खचले आहेत. त्यामुळे त्यांना वन विभागाने नियुक्ती द्यावी किंवा त्यांना आत्मदहन करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आदिवासी माना विद्यार्थी युवा संघटनेचे प्रा. राजू केदार यांनी केली आहे.
पत्रकार परिषदेला अन्यायग्रस्त युवकही उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)