पशुवैद्यकीय दवाखाना सांभाळतो परिचर

By Admin | Updated: July 31, 2016 02:06 IST2016-07-31T02:06:41+5:302016-07-31T02:06:41+5:30

चामोर्शी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या चापलवाडा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुधन पर्यवेक्षकाचे पद गेल्या तीन महिन्यापासून रिक्त आहे.

The attendant coordinates the veterinary dispensary | पशुवैद्यकीय दवाखाना सांभाळतो परिचर

पशुवैद्यकीय दवाखाना सांभाळतो परिचर

चापलवाडात पशुधन पर्यवेक्षकाचे पद रिक्त : पशुवैद्यकीय सेवेवर परिणाम
घोट : चामोर्शी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या चापलवाडा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुधन पर्यवेक्षकाचे पद गेल्या तीन महिन्यापासून रिक्त आहे. परिणामी १२ गावातील जनावरांची पशुवैद्यकीय सेवा एकाच परिचरावर आहे. त्यामुळे पशुपालक शेतकरी प्रचंड त्रस्त आहेत.
चापलवाडा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात कार्यरत पशुधन पर्यवेक्षक यांचा १३ मे २०१६ रोजी हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तेव्हापासून येथील पशुधन पर्यवेक्षकाचे पद रिक्त आहे. या दवाखान्यांतर्गत घोट परिसरातील १२ गावांचा समावेश आहे.
यामध्ये मक्केपल्ली, चापलवाडा माल, चापलवाडा चेक, वरूर, पलासपूर, गांधीनगर, मक्केपल्ली चेक नंबर ४, कोतेपल्ली पॅच, मक्केपल्ली चेक नंबर १, मछली (घोट), मक्केपल्ली चेक नंबर ३ आदी गावांचा समावेश आहे.
या १२ गावांमध्ये गाय वर्गातील ३ हजार ८२९, म्हैस २२१ व शेळ्यांची संख्या २ हजार १२४ असे एकूण ५ हजार २७४ पशुधन संख्या आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पशुधन असतानाही जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाने चापलवाडा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुधन पर्यवेक्षकाचे पद भरण्याच्या कार्यवाहीकडे दुर्लक्ष करीत आहेत.
सदर समस्येकडे शासनाचेही प्रचंड दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय दवाखान्याची सेवा कोलमडली असल्यामुळे ऐन खरीप हंगामात विविध आजाराने या भागातील जनावरे दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यात पाळीव जनावरांना विविध रोगाची लागण होण्याची दाट शक्यता असते. या पार्श्वभूमीवर पशुपालक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी चापलवाडा येथील पशुधन पर्यवेक्षकाचे पद भरण्यात यावे, अशी मागणी पशुपालक शेतकऱ्यांनी केली. (वार्ताहर)

औषधसाठा व लसीकरणाचा अभाव
चापलवाडा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील औषधांचा साठा संपला असून जनावरांच्या लसीकरणाचे कामही थंडबस्त्यात आहे. त्यामुळे पशुपालक शेतकरी संकटात सापडले आहेत. विशेष म्हणजे, पशुधन पर्यवेक्षकाच्या स्वाक्षरीशिवाय पशुवैद्यकीय दवाखान्याला जनावरांच्या रोगावरील औषधसाठा मिळत नसल्याचे चित्र आहे.

 

Web Title: The attendant coordinates the veterinary dispensary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.