महिला रूग्णालयासमोरील जागा बळकाविण्याचे व्यावसायिकांचे प्रयत्न
By Admin | Updated: December 6, 2014 22:48 IST2014-12-06T22:48:57+5:302014-12-06T22:48:57+5:30
स्थानिक इंदिरा गांधी चौकात १०० खाटांच्या महिला रूग्णालयाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. या ठिकाणी भविष्यात होणारी गर्दी लक्षात घेऊन संरक्षक भींतीच्या समोर अतिक्रमण करून जागा

महिला रूग्णालयासमोरील जागा बळकाविण्याचे व्यावसायिकांचे प्रयत्न
गडचिरोली : स्थानिक इंदिरा गांधी चौकात १०० खाटांच्या महिला रूग्णालयाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. या ठिकाणी भविष्यात होणारी गर्दी लक्षात घेऊन संरक्षक भींतीच्या समोर अतिक्रमण करून जागा बळकाविण्याचा प्रयत्न व्यावसायिकांनी सुरू केला आहे.
जिल्हा सामान्य रूग्णालयावर संपूर्ण जिल्ह्यातील रूग्णांचा भार आहे. या ठिकाणी उसळणारी गर्दी लक्षात घेऊन महिलांसाठी स्वतंत्र रूग्णालय बांधण्यात यावे, अशी मागणी केली जात होती. त्यानुसार शासनाने स्थानिक इंदिरा गांधी चौकात महिला व बाल रूग्णालयाचे बांधकामाला मंजुरी दिली. सदर रूग्णालयाचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आहे. महिला रूग्णालय शहराच्या मध्यभागी आहे. जिल्ह्याच्या इतर ठिकाणावरून येणारी चारही मुख्य रस्ते इंदिरा गांधी चौकात येऊन मिळतात. त्यामुळे या चौकात नेहमीच गर्दी राहत असल्याने चौकात अतिक्रमण करून दुकाने थाटण्यात आली आहेत.
काही दिवसातच महिला रूग्णालयसुध्दा सुरू होईल. या ठिकाणी येणारे रूग्ण व त्यांचे नातेवाईक यामुळे गर्दीत आणखी भर पडणार आहे. परिणामी या परिसरात खर्रा, चहा व इतर वस्तुंची विक्री मोठ्या प्रमाणात होईल. हा अंदाज लक्षात घेऊन संरक्षक भींतीला लागूनच व्यावसायिकांनी अतिक्रमण करून जागा बळकाविणे सुरू केले आहे. याच ठिकाणी चंद्रपूरकडे जाणाऱ्या बसचा थांबा आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रवाशांचीही गर्दी राहते. अतिक्रमणामुळे या ठिकाणी अपघात होण्याची संख्याही वाढली आहे. त्यामुळे सदर अतिक्रमण काढण्याची मागणी होत आहे. (नगर प्रतिनिधी)