जंगलात तार पसरवून शिकार करण्याचा प्रयत्न, तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:44 IST2021-02-20T05:44:50+5:302021-02-20T05:44:50+5:30
आष्टी : चौडमपल्ली वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या कुनघाडा (माल) बिटमधील कक्ष क्र. २३७ मध्ये बारीक तार पसरवून वन्य ...

जंगलात तार पसरवून शिकार करण्याचा प्रयत्न, तिघांना अटक
आष्टी : चौडमपल्ली वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या कुनघाडा (माल) बिटमधील कक्ष क्र. २३७ मध्ये बारीक तार पसरवून वन्य प्राण्यांना त्यात अडकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन आरोपींना वनविभागाच्या पथकाने अटक केली. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. यातील काही आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले.
चंदनखेडी (वन) येथील व्यक्तींनी कुनघाडा बिटमधील जंगलात वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी लोखंडी बारीक तार पसरल्याची गुप्त माहिती ठाकरी येथील क्षेत्र सहायक ए. एम. पोतगंतावार यांना मिळाली. पोतगंतावार यांनी त्यांच्या अधिनस्त वनकर्मचारी एस. व्ही. झाडे, वनरक्षक डी. एस. येनगंतीवार, वनरक्षक आर. एम. लिपटे व चौकीदारांना सोबत घेऊन बुधवारच्या रात्री ८ वाजता जंगलात सापळा रचला. रात्री ९.३० वाजता आरोपी रामदास कुसनाके, तिरकमराव सीडाम, संतोष करपते ( सर्व रा. चंदनखेडी (वन) यांना मोक्यावर पकडले. त्यांच्याकडून लोखंडी तार, सुरा, स्टील ग्लास, चादर असा ऐवज जप्त केला. त्यांच्याविरुद्ध वन्यप्राणी कायदा १९७२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
चपराळा अभयारण्याचे विभागीय वनाधिकारी नीतेश देवगडे आणि चौडमपल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली १८ फेब्रुवारीला या प्रकरणाचा संपूर्ण तपास करून आरोपींना अटक करण्यात आली. त्यांना चामोर्शी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना जमीन नामंजूर केल्याने तिन्ही आरोपींना चंद्रपूर येथे मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले.
ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी मनीष पवार, क्षेत्र सहायक ए. एम. पोतगंतावार, क्षेत्र सहायक एम. जी. गोवर्धन, एस. व्ही. झाडे , डी. एस. येनगंतीवार, आर. एम. लिपटे, लिपिक विश्वनाथ मंथनवार यांनी केली.