सभापतीकडून जागा बळकावण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: August 1, 2016 01:36 IST2016-08-01T01:36:48+5:302016-08-01T01:36:48+5:30
पंचायत समितीच्या मालकीच्या जागेवर खासगी लोकांना बेकायदेशीरपणे इमारत बांधून देऊन त्यावर वहिवाट..

सभापतीकडून जागा बळकावण्याचा प्रयत्न
एटापल्लीत पत्रकार परिषद : शिवसेना पदाधिकाऱ्यांचा दीपक फुलसंगे यांच्यावर आरोप
एटापल्ली : पंचायत समितीच्या मालकीच्या जागेवर खासगी लोकांना बेकायदेशीरपणे इमारत बांधून देऊन त्यावर वहिवाट करण्याचा प्रयत्न पं. स. सभापती दीपक फुलसंगे यांच्याकडून होत असून या मार्गाने ते आर्थिक माया गोळा करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी एटापल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेतून केला.
पंचायत समितीच्या ११ फेब्रुवारी २०१६ च्या मासिक सभेत ठराव क्रमांक ४/९ द्वारे १० लोकांना गाळे बांधकाम करून देण्याबाबत परवानगी देण्यात आली. सदर लोकांची नावे निश्चित करण्याकरिता पं. स. ने अनेक बाबींची पूर्तता करणे गरजेचे होते. मात्र एकाही अटीची पूर्तता करण्यात आलेली नाही. आपल्या मर्जीतील लोकांना शासकीय जमिनीवर अतिक्रमण करण्याची परवानगी देण्यात आली आहे. शासकीय जमिनीवर अकृषक बांधकामाची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांकडून घेण्यात आली काय? शासकीय जमीन भाड्याने देण्याचे शासनाचे धोरण अवलंबण्यात आले काय? बांधकाम करण्याचे व भाड्याने देण्याची जाहिरात वृत्तपत्रातून प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. ज्या व्यक्तींना गाळे बांधण्याची परवानगी देण्यात आली, ते व्यक्ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नाहीत. यासह अनेक महत्त्वपूर्ण नियमांची पायमल्ली पं. स. सभापतींकडून करण्यात आली आहे. त्यामुळे गाळे बांधकामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजगोपाल सुल्वावार, तालुका प्रमुख अंचलेश्वर गादेवार, किसन मट्टामी, तालुका युवा प्रमुख राघवेंद्र सुल्वावर, मनीष दुर्गे, अरूण तेलकुंटवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून केली. (तालुका प्रतिनिधी)