बौद्ध भिक्षूवरील हल्ल्याचा निषेध
By Admin | Updated: September 9, 2015 01:30 IST2015-09-09T01:30:21+5:302015-09-09T01:30:21+5:30
चंद्रपूर येथील चोर खिडकी परिसरातील बुद्ध विहारात प्रवेश करून काही गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी बौद्ध भिक्षूंना मारहाण केल्याची घटना घडली.

बौद्ध भिक्षूवरील हल्ल्याचा निषेध
हल्लेखोरांवर कारवाई करा : गडचिरोलीत जिल्हाधिकारी व आरमोरीत तहसीलदारांना निवेदन
गडचिरोली/ आरमोरी : चंद्रपूर येथील चोर खिडकी परिसरातील बुद्ध विहारात प्रवेश करून काही गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी बौद्ध भिक्षूंना मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेचे गडचिरोली व आरमोरी शहरात तीव्र पडसाद उमटले असून या दोनही शहरातील विविध आंबेडकरी व बौद्ध संघटनांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. गडचिरोली येथे जिल्हाधिकाऱ्यांना व आरमोरी येथे तहसीलदारांना निवेदन देऊन बौद्ध भिक्षूंना मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
सोमवारी दुपारी भारतीय बौद्ध महासभा गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष सी. पी. शेंडे व भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष रोहिदास राऊत यांच्या नेतृत्त्वात बौद्ध व आंबेडकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी रणजितकुमार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. यावेळी कुलपती मेश्राम, लहूकुमार रामटेके, रामदास टिपले, सुरेखा बारसागडे, वनमाला भजगवळी, रेखा वंजारी, कवडू उंदीरवाडे, जगन जांभुळकर, डी. बी. मेश्राम, दिनकर रामटेके, दर्शना मेश्राम, कांता ढवळे, राहुल दुर्गे, नीलेश बारसागडे, राहूल शेंडे, सोनम रामटेके, प्रदीप बांबोळे, राजेश खोब्रागडे आदी उपस्थित होते.
आरमोरीचे तहसीलदार मनोहर वलथरे यांना बौद्ध भिक्षूवरील हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय बौद्ध महासभा, भारिप बहुजन महासंघ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मंडळ व जेतवन बुद्ध विहार समिती आरमोरीच्या वतीने निवेदन देण्यात आले. मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यातून करण्यात आली. निवेदन देताना धर्मा बांबोळे, हंसराज बडोले, भीमराव ढवळे, गणपत शेंडे, केशव बांबोळे, वासुदेव शेंडे, जगदीश रामटेके, संजय वाकडे, वासुदेव अंबादे, मुकेश मेश्राम, वसंत इंदूरकर, शालिनी गेडाम, इंदिरा देशपांडे, रसिका इंदूरकर, सुलक्षणा सहारे, वंदना नंदागवळी, सुरेखा कांबळे, अंतकला जांभुळकर आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी व तहसीलदारांमार्फत मागण्यांचे निवेदन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)