विद्यमान पदाधिकारीही निवडणुकीत : दुर्गम भागात दुचाकीच्या माध्यमातून प्रचार रवी रामगुंडेवार एटापल्ली तालुक्यातील चार जिल्हा परिषद क्षेत्रांकरिता २५ तर आठ पंचायत समिती गणांकरिता ३९ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेकरिता एटापल्ली पंचायत समितीचे विद्यमान सभापती दीपक फुलसंगे व उपसभापती संजय चरडुके तर पंचायत समितीकरिता माजी सभापती व विद्यमान सदस्य सपना कोडापे या निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उडेरा-गुरूपल्ली जिल्हा परिषद क्षेत्राची जागा नामाप्र महिलेकरिता राखीव आहे. या मतदार संघात काँग्रेसच्या मार्फत रागिणी दशरथ अडगोपुलवार, आविसच्या सारिका प्रवीण आईलवार, अपक्ष म्हणून ज्योत्सना रामजी कत्तीवार, भाजपातर्फे जिल्हा परिषदेच्या विद्यमान समाजकल्याण सभापती सुवर्णा विलास खरवडे, अपक्ष म्हणून उषा अरविंद ठाकरे, राकाँतर्फे संगीता रामरेड्डी बिरमवार, अपक्ष म्हणून सोनी गुणाजी भगत हे सात उमेदवार रिंगणात आहेत. ज्योत्स्ना कत्तीवार ही माजी जिल्हा परिषद सदस्य रामजी कत्तीवार यांची कन्या आहे. उषा ठाकरे यांनी काँग्रेसकडून तिकीट मागितले होते. मात्र काँग्रेसने तिकीट न दिल्याने त्या अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. गट्टा-पुरसलगोंदी क्षेत्राची जागा अनुसूचित जमातीकरिता राखीव आहे. यामध्ये अपक्ष म्हणून सैनू मासू गोटा, राकाँतर्फे राजू भीमा नरोटी, काँग्रेसतर्फे नंदकुमार नाजुकराव नरोटे, दीपक कुंजीलाल फुलसंगे हे चार उमेदवार रिंगणात आहेत. आदिवासी विकास महामंडळाचे माजी संचालक सैनू गोटा हे गट्टा गावात राहून मागील दीड वर्षांपासून या परिसरातील गावागावात जाऊन पेसा कायद्याअंतर्गत सभा घेऊन आदिवासींमध्ये जनजागृती करण्याचे काम करीत होते. सैनू गोटा न्यायालयीन कोठडीत असताना नामांकन अर्ज भरण्यात आला. सैनू गोटांची उमेदवारी कायम आहे. याच गट्टा-पंचायत समिती गणातून अपक्ष उमेदवार म्हणून सैनू गोटा यांच्या पत्नी शीला गोटा यासुद्धा उभ्या आहेत. हालेवारा-गेदा क्षेत्र अनुसूचित जमाती महिलाकरिता राखीव आहे. या क्षेत्रातून भाजपातर्फे कल्पना प्रशांत आत्राम, राकाँतर्फे ज्योती चंदू कोरामी, काँग्रेसतर्फे लक्ष्मी गोगलू गावडे, अपक्ष म्हणून सुमित्रा नागेश गावडे, शिवसेनेकडून माया मंगुजी नरोटे, आविसतर्फे मनीषा भाऊजी रापंजी हे सहा उमेदवार रिंगणात आहेत. मनीषा रापंजी ही विद्यमान जि. प. सदस्य कारूजी रापंजी यांची सून आहे. जारावंडी-कसनसूर ही जागा नामाप्रकरिता राखीव असल्याने या क्षेत्रात सर्वाधिक आठ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये शिवसेनेकडून खुशाल मारोती गावतुरे, काँग्रेसतर्फे पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती संजय भाऊजी चरडुके, अपक्ष म्हणून सदाशिव देऊ जेंगठे, राकाँतर्फे ऋषीकांत लक्ष्मण पापडकर, भाजपातर्फे संजय पुरूषोत्तम पोहणेकर, बसपातर्फे रमेश आनंदराव मडावी, आविसतर्फे लहुजी फकिरा शेंडे, अपक्ष म्हणून देवनाथ रामा सोनुले हे उमेदवार रिंगणात आहेत. संजय पोहणेकर हे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा पोहणेकर यांचे चिरंजीव आहेत. एटापल्ली तालुक्यातील चारही मतदार संघातील बहुतांश उमेदवार तुल्यबळ आहेत. सर्वच उमेदवारांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. ज्या गावांमध्ये चारचाकी वाहन जात नाही, अशा गावांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमदेवारांचे कार्यकर्ते दुचाकीच्या माध्यमातून प्रचार करीत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.
एटापल्लीत ६४ उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2017 02:04 IST