सुरजागड लोहप्रकल्पावरून वातावरण तापले
By Admin | Updated: April 14, 2016 01:36 IST2016-04-14T01:36:44+5:302016-04-14T01:36:44+5:30
सुरजागड लोहप्रकल्प हा एटापल्ली येथेच उभारण्यात यावा, खासगी कंपनी कच्या लोहखनिजाची वाहतूक करीत आहे.

सुरजागड लोहप्रकल्पावरून वातावरण तापले
आविसंचे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण : बचाव समितीचे ३२ कार्यकर्ते दुसऱ्या दिवशीही साखळी उपोषणावर
एटापल्ली : सुरजागड लोहप्रकल्प हा एटापल्ली येथेच उभारण्यात यावा, खासगी कंपनी कच्या लोहखनिजाची वाहतूक करीत आहे. ती बंद करून जनसुनावणी घेण्यात यावी, या मागणीसाठी बुधवारी आदिवासी विद्यार्थी संघाच्या वतीने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपोषणाचे नेतृत्व माजी आमदार दीपक आत्राम यांनी केले.
या आंदोलनात जि.प. सभापती अजय कंकडालवार, जि.प. सदस्य कारू रापंजी, गीता हिचामी, मंदा शंकर, आविसंचे सिरोंचा तालुकाध्यक्ष बानय्या जनगम, रवी सल्लम, मंगेश हलामी, श्रीकांत चिप्पावार, रूनिता तलांडे, सरपंच हरिष पदा, रमेश वैरागडे, शंकर दासरवार, रवी खोब्रागडे, गुरूदेव पेंदाम व एटापल्ली तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी एटापल्लीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना आदिवासी विद्यार्थी संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनात एटापल्ली तालुक्यात सुशिक्षीत बेरोजगारांना प्रशिक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे व प्रकल्प स्थळाचा विकास करावा, या भागात मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करावे, असे म्हटले आहे.
तर सुरजागड बचाव संघर्ष समितीच्या वतीने १२ एप्रिलपासून बसस्थानकासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले. शासनाने प्रकल्पाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी व तोपर्यंत लोहखनिजाची वाहतूक बंद करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. बुधवारी उपोषणाचा दुसरा दिवस होता. सुरेश बारसागडे यांच्या नेतृत्वात हे उपोषण सुरू असून उपोषण मंडपाला काँग्रेसच्या नेत्या सगुना तलांडी यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी यावेळी चर्चा केली. या उपोषणात ३२ कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
सुरजागड प्रकल्प जिल्ह्यातच व्हावा - नाना पटोले यांची मागणी
देसाईगंज : लोहखनिज प्रकल्प इतर जिल्ह्यात होणे ही अन्यायपूर्ण बाब असून तो प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यातच झाला पाहिजे व येथेच लोहनिर्मितीची पूर्ण प्रक्रिया पार पडली पाहिजे. अन्यथा आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करू व एकही लोह दगड येथून नेऊ देणार नाही, असा इशारा भंडारा, गोंदिया येथील खासदार नाना पटोले यांनी देसाईगंज येथे पत्रकारांशी बोलताना दिला. देसाईगंज येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, २००६ मध्ये आमदार असताना सार्वजनिक उपक्रम समितीच्या दौऱ्यात गडचिरोली जिल्ह्यात आपण ही मागणी लावून धरली होती. जिल्ह्यातील जनतेला फक्त वेठबिगाराप्रमाणे लोहउत्खननाच्या कामासाठी वापरून प्रकल्प इतरत्र सुरू व्हावा, ही बाब उद्योगविरहित जिल्ह्यासाठी अन्यायकारक ठरेल. येथे लोह प्रकल्प सुरू झाल्यास जिल्ह्याचा चौफेर विकास होईल. ही बाब आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर मांडणार आहो. जिल्ह्याबाहेर प्रकल्प नेण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन उभारू, असे ते म्हणाले. यावेळी जेसा मोटवानी उपस्थित होते.