कमलापुरात ‘अजित’च्या धुमाकुळाने वातावरण भयभीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 05:01 IST2020-06-11T05:00:00+5:302020-06-11T05:01:04+5:30
कमलापूर येथील हत्ती कॅम्पमध्ये १० हत्ती असून त्यांची देखरेख करण्यासाठी चार नियमित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय ८ रोजंदारी कर्मचारीही येथे तैनात आहेत. येथे असलेल्या १२ कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण मिळत नसल्याने हत्तींना हाताळण्यासाठी व सांभाळण्यासाठी त्यांना अडचणीचे ठरले आहे. अजित नावाचा हत्ती नेहमीच चवताळल्यासारखा करत असून त्याला सांभाळणे कठीण होत आहे.

कमलापुरात ‘अजित’च्या धुमाकुळाने वातावरण भयभीत
श्रीधर दुग्गीरालापाठी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कमलापूर : अहेरी तालुक्याच्या कमलापूर येथील हत्ती कॅम्पमधील ‘अजित’ नावाच्या हत्तीने मागील दोन दिवसांपासून धुमाकूळ घातल्याने येथील कर्मचाऱ्यांना हत्तीला सांभाळणे कठीण झाले आहे. त्यातही अजित नावाच्या हत्तीने जंगलात दोन दिवस मुक्काम ठोकला. कर्मचाऱ्यांनी त्याला हत्ती कॅम्पमध्ये आणण्याचा पूर्ण प्रयत्न केला, मात्र हत्ती ऐकण्यास तयार नसल्याने कर्मचाऱ्यांनी पुन्हा या हत्तीला जंगलात सोडले. अखेर बुधवारी अजित कॅम्पमध्ये परत आला. मात्र त्याला नियंत्रित करणे कर्मचाऱ्यांसाठी कठीण झाले आहे.
कमलापूर येथील हत्ती कॅम्पमध्ये १० हत्ती असून त्यांची देखरेख करण्यासाठी चार नियमित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय ८ रोजंदारी कर्मचारीही येथे तैनात आहेत. येथे असलेल्या १२ कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण मिळत नसल्याने हत्तींना हाताळण्यासाठी व सांभाळण्यासाठी त्यांना अडचणीचे ठरले आहे. अजित नावाचा हत्ती नेहमीच चवताळल्यासारखा करत असून त्याला सांभाळणे कठीण होत आहे.
सदर हत्ती पुन्हा धुमाकूळ घालत असल्याने कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील दोन दिवसांपासून अजितने जंगलातच मुक्काम ठोकला. कर्मचाऱ्यांनी त्याला कॅम्पमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. पण त्याला येथे आणणे शक्य झाले नाही. उलट सदर हत्ती कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावत येऊ लागल्याने त्याला जंगलातच सोडून परत यावे लागले. तिसऱ्या दिवशी अजित स्वत:च कॅम्पमध्ये परत आला. मात्र कर्मचारी त्याच्याजवळ जाऊ शकले नाही. परिणामी त्याला मोकाटच सोडावे लागले. तो धुमाकूळ घालत असून रस्त्यावर रहदारी सुरू असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
यापूर्वी अजितने कर्मचारी पेंटा आत्राम याला ठार केले होते. त्यानंतर रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांवर हल्ला चढविला होता. यामध्ये वाहनधारकांचे मोठे नुकसान झाले होते. तसा प्रकार आता होऊ नये, यासाठी वनविभागाने तातडीची उपाययोजना करावी, अशी मागणी या परिसरातील नागरिक व वन्यजीव प्रेमींनी केली आहे.
रिक्त पदांचा प्रश्न कायम
हत्तीवर नियंत्रण कसे ठेवावे याचे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी वनविभागाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. केवळ १२ कर्मचाºयांच्या भरवशावर येथील हत्तींची देखभाल सुरू आहे. येथे एका हत्तीच्या मागे एक माहुत आणि एक चारा कटाई करणाऱ्याची आवश्यकता आहे. मात्र रिक्त पदे असल्याने येथील हत्तीला परिपूर्ण सेवा देणे कठीण होत आहे. येथील रिक्त पदे भरून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची मागणी जोर धरत आहे. तशी कार्यवाही न केल्यास २०१३ मध्ये घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती नाकारता येणार नाही. या ठिकाणी अनेक पर्यटक जात होते. मात्र कोरोनामुळे जिल्हाबाहेरील पर्यटक येणे बंद झाले आहेत.
‘अजित’च्या पायाला जखम झाली असून त्याला इतर हत्तींपासून दूर ठेवण्यात येत आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्याच्यावर औषधोपचार सुरू आहे. सोमवारी मी स्वत: अजितला बघितले असून त्यानंतर काय झाले, याची मला माहिती नाही.
- जे.व्ही.घुगे, वनपरिक्षेत्राधिकारी, कमलापूर