अतिक्रमण कायमच !
By Admin | Updated: May 3, 2015 01:11 IST2015-05-03T01:11:55+5:302015-05-03T01:11:55+5:30
वाहनावरील नियंत्रण सुटणे, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे, ....

अतिक्रमण कायमच !
गडचिरोली : वाहनावरील नियंत्रण सुटणे, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे, वाहनामध्ये बिघाड आदी कारणामुळे राज्य महामार्गावर अपघात होत असतात. मात्र शहरात चालकांचा काहीही दोष नसतांना वेगळ्याच कारणाने अपघात वाढले आहेत. शहरातील चारही मुख्य मार्गावर दुकानदारांनी आपल्या दुकानातील सामान ५ ते १० फुटाच्या अंतरावर बाहेर काढून ठेवतात. यामुळे रस्ता अरूंद होत असून शहरात अपघाताची मालिका वाढली आहे. अतिक्रमणाच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. मात्र याकडे स्थानिक नगरपालिका व पोलीस प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
रस्ता दुभाजकावरील पथदिव्याचे अनेक खांब वाकले आहेत. दुभाजकही ३० ते ३५ फुट अंतरापर्यंत तुटले आहे. यामुळे पालिकेचेही नुकसान झाले. रस्ता दुभाजकावर वाहन चढल्याची पहिली घटना नाही. यापूर्वी चामोर्शी मार्गावरील शासकीय विज्ञान महाविद्यालयासमोर एक ते दोन ट्रक दुभाजकावर चढले. तसेच कारही दुभाजकावर चढली. धानोरा मार्गावरील लांझेडा परिसरात ट्रक दुभाजकावर चढला. आरमोरी मार्गावरही वाहन दुभाजकावर चढले.
शहरातील चारही मुख्य मार्गावरील दुभाजकाला वाहनांची धडक बसली आहे. लाखो रूपये खर्च करून नगर पालिका प्रशासनाने दुभाजक उभारले. मात्र त्यापूर्वी अतिक्रमणाची समस्या मार्गी लावली नाही. तसेच या मार्गावरील मोठे व्यावसायिक आणि फुटपाथ दुकानदारांना अतिक्रमण न करण्याबाबत तंबी दिली नाही. परिणामी दुकानदारांनी चारही मुख्य मार्गावर अतिक्रमण करून अर्धा रस्ता काबिज केला आहे. दुभाजकापासून रस्त्यापर्यंतची रूंदी केवळ १५ फुट उरली असून एवढ्याशा रस्त्यावरून एका वेळेस फक्त एकच चारचाकी वाहन जाऊ शकते. सध्या शहरात आवागमण करणाऱ्या चारचाकी व दुचाकी वाहनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. शाळकरी मुलेही सुसाट वेगाने वाहने चालवित आहेत. यामुळे शहरात रोजच छोटे-मोठे अपघात घडत आहेत.
नियमबाह्य वाहतुकीवर पोलीस प्रशासनाचे नियंत्रण नाही. येथील इंदिरा गांधी चौकात दुपारच्या सुमारास वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी अनेक वाहनचालक ट्रिपल सीट, अल्पवयीन शाळकरी मुली तसेच मुले सुसाट वेगाने वाहने चालवित आहेत. आजमितीस शहरात वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसविले असल्याचे दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)