एटापल्लीत कडकडीत बंद
By Admin | Updated: April 17, 2016 01:03 IST2016-04-17T01:03:21+5:302016-04-17T01:03:21+5:30
सुरजागड लोहप्रकल्प एटापल्ली तालुक्यातच निर्माण करावा, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी सुरजागड बचाव संघर्ष समितीतर्फे बंदचे आवाहन केले होते.

एटापल्लीत कडकडीत बंद
व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद : नायब तहसीलदारांना निवेदन
एटापल्ली : सुरजागड लोहप्रकल्प एटापल्ली तालुक्यातच निर्माण करावा, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी सुरजागड बचाव संघर्ष समितीतर्फे बंदचे आवाहन केले होते. या बंदला एटापल्ली शहरातील व्यावसायीक तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला.
शनिवारी सकाळी संपूर्ण शहरातून रॅली काढण्यात आली व सुरजागड प्रकल्पाबाबत नारे देऊन जनजागृती करण्यात आली. दुपारी २ वाजताच्या सुमारास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. २.३० वाजताच्या सुमारास उपभागीय कार्यालयावर मोर्चा काढून नायब तहसीलदार एम. सी. रच्चा व आर. पी. मेश्राम यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात एटापल्लीसह गट्टेपल्ली, वट्टेगट्टा, बट्टेर, बांडे, हेडरी, येवली, तांबडा, एकरा, कारमपल्ली, आलेंगा आदी गावातील नागरिक सहभागी झाले होते.
एटापल्ली शहरातील सर्व व्यावसायिक प्रतिष्ठाने, चहाटपरी, औषधी दुकाने बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे एटापल्ली शहरात संचारबंदी लावल्यागत परिस्थिती निर्माण झाली होती. आंदोलनाचे नेतृत्व सुरेश बारसागडे, सचिन खांडेकर, महेश पुल्लूरवार, दिनेश सोनटक्के, संदीप सेलवटकर, प्रसाद नामेवार, गणेश खेडेकर, गोपी बारसा, सुरज बोरकर, कुणाल करमकर, संगीता पुंगाटी, मधुसुदन कंकनालवार, पायल बारसा, सशांत नामेवार, राधा बारसागडे, मिथून जोशी, माया पुलीवार, अशोक पुल्लूरवार यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. लोहखनिजाची वाहतूक बंद न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.