एटापल्लीत उपसभापतीचे आंदोलन
By Admin | Updated: March 19, 2015 01:29 IST2015-03-19T01:29:16+5:302015-03-19T01:29:16+5:30
एटापल्ली पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी एन. डी. माटुरकर यांच्या स्थानांतरणाच्या मागणीसाठी एटापल्ली ...

एटापल्लीत उपसभापतीचे आंदोलन
एटापल्ली : एटापल्ली पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी एन. डी. माटुरकर यांच्या स्थानांतरणाच्या मागणीसाठी एटापल्ली पंचायत समितीचे उपसभापती संजय भाऊराव चरडुके यांनी बुधवारी एटापल्ली पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आंदोलन केले.
माटुरकर हे एटापल्ली पंचायत समितीला रूजू झाल्यापासून शासन नियम धाब्यावर ठेऊन मनमर्जीने कामकाज चालवित आहे, असा आरोप उपसभापतींनी केला आहे. त्यांच्याविषयी प्रचंड तक्रारी असल्याने त्यांची येथून बदली करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी या आंदोलनाद्वारे केली आहे. या आंदोलनाला एटापल्लीचे पं. स. सभापती दीपक फुलसंगे, पं. स. सदस्य बालाजी आत्राम, जयाबाई पुडो, ललीता मट्टामी, माजी जि. प. सदस्य रामजी कत्तीवार, वासामुंडीचे पोलीस पाटील गजानन मडावी, एटापल्लीचे उपसरपंच राजाराम जंबोजवार, ग्रा. पं. सदस्य गुरूदास आत्राम, महादेव मडावी, मालू मडावी, संबा हिचामी आदींनी उपोषण मंडपाला भेट देऊन पाठिंबा दर्शविला.
यापूर्वीही चरडुके यांनी गटशिक्षणाधिकाऱ्याच्या विरोधात मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. गडचिरोली, संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. (तालुका प्रतिनिधी)