कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आष्टी शहर झाले बकाल
By Admin | Updated: January 14, 2015 23:09 IST2015-01-14T23:09:06+5:302015-01-14T23:09:06+5:30
जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेले आष्टी परिसरातील मोठी बाजारपेठ आहे. मात्र या ठिकाणी अनेक समस्या अद्यापही सुटलेल्या नाहीत. गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्यांमध्ये स्वच्छता,

कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आष्टी शहर झाले बकाल
सुधीर फरकाडे - आष्टी
जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेले आष्टी परिसरातील मोठी बाजारपेठ आहे. मात्र या ठिकाणी अनेक समस्या अद्यापही सुटलेल्या नाहीत. गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्यांमध्ये स्वच्छता, पथदिवे, पाणीपुरवठा, नाल्यांचा उपसा याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. यासंदर्भात वारंवार तक्रार करूनही ग्रामपंचायत प्रशासन या प्रश्नाकडे कानाडोळा करीत आहे. आष्टी ग्रामपंचायतीत एकूण ५ वार्ड असून १३ सदस्यांची ग्रामपंचायत आहे. १० हजारावर लोकसंख्या असलेल्या आष्टीच्या समस्यांचे ग्रहण सुटणार कधी, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.
जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे असलेले चपराळा येथील देवस्थानमध्ये जाण्यासाठी आष्टी येथूनच जावे लागते. त्यामुळे जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील अनेक नागरिक आष्टी येथे येतात. गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या वैनगंगा नदी किनाऱ्यावर असलेल्या इंग्रजकालीन विश्रामगृहाचे बांधकाम ब्रिटीशांनी केले. उंचावर असलेल्या या विश्रामगृहावरून बारमाही वाहणारी वैनगंगा नदी व येथील निसर्गरम्य वातावरण प्रसन्न करणारे आहे. त्यामुळे असंख्य नागरिकांची गर्दी आष्टी येथे पाहायला मिळते. मात्र या गावाच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक सोयीसुविधा अद्यापही झालेल्या नाहीत. छोटे- छोटे प्रश्न अजूनही कायम आहेत. यामध्ये वार्ड क्र. ४ मध्ये अडेटवार यांचे घरासमोरील रस्त्यावर विद्युत खांब गेल्या कित्येक वर्षांपासून आहे. त्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यास अडथळा निर्माण होत आहे. तो खांब अद्याप तेथून हटविण्यात आलेला नाही.
आष्टी हे मुख्य मार्गावरचे ठिकाण आहे. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा असलेला चौक आहे. या चौकात नागरिकांची मोठी वर्दळ राहते. या चौकात अनेक खासगी वाहनेही उभे राहतात. चौकाच्या सौंदर्यीकरणाकडेही दुर्लक्ष आहे. वैनगंगा नदीवर असलेला पूल हा अरूंद व ठेंगणा आहे. पावसाळ्यात धरणाचे पाणी सोडल्यास वा अतिवृष्टी झाल्यास या पुलावरून पाणी वाहते व आलापल्ली-चंद्रपूर मार्गावरची वाहतूक बंद होते. या पुलाची उंची वाढविण्याची गरज आहे. परंतु या प्रश्नाकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष आहे. आष्टी गावाचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे गावाचा नियोजनही भविष्यातील गरजा लक्षात घेऊन होण्याची गरज आहे. मात्र याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे आष्टीच्या समस्या अद्यापही सुटलेल्या नाहीत. लोकप्रतिनिधी केवळ आश्वासन देण्याचे काम करीत आहेत.