आष्टीत शहर विकास आघाडी सत्तेत
By Admin | Updated: May 7, 2015 01:20 IST2015-05-07T01:20:18+5:302015-05-07T01:20:18+5:30
ग्राम पंचायत निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांना चारही मुंड्या चित करीत आष्टी ग्रा. पं. वर राकेश बेलसरे यांच्या गटाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

आष्टीत शहर विकास आघाडी सत्तेत
आष्टी : ग्राम पंचायत निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांना चारही मुंड्या चित करीत आष्टी ग्रा. पं. वर राकेश बेलसरे यांच्या गटाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. १५ सदस्यीय ग्रा. पं. मध्ये १२ जागांवर विजय मिळवित यश संपादन केले. राकेश बेलसरे यांनी दोन वॉर्डातून प्रचंड मतांनी विजय मिळवून विक्रम प्रस्थापित केला आहे.
राकेश बेलसरे यांच्या शहर विकास आघाडीची सत्ता ग्रा. पं. वर काबीज होऊ नये, याकरिता सर्व राजकीय पक्षांचे नेते एकत्र आले होते. मात्र बेलसरे यांनी आपल्या आघाडीत योग्य उमेदवारांना संधी देत प्रत्येक वॉर्डात सक्षम उमेदवार उभे केले. जुन्या सदस्यांना तिकीट नाकारून नव्यांना संधी दिली. यात शहर विकास आघाडीला मोठ्या प्रमाणात यश प्राप्त झाले. एकूण १२ सदस्य निवडून आणत विरोधकांना चांगलाच धक्का दिला. अनेक जुन्या सदस्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. वॉर्ड क्रमांक दोन मधून २५० मतांनी तर वॉर्ड क्रमांक पाच मधून १२० मतांनी बेलसरे निवडून आले. दोन वॉर्डांतून निवडून येण्याचा विक्रम बेलसरे यांनी प्रस्थापित केला आहे. ग्राम पंचायतीवर दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्यात यश मिळविले आहे. निवडून आलेल्या सदस्यांमध्ये कपील पाल हे एकमेव जुने सदस्य आहेत. तर उर्वरित संपूर्ण नवीन सदस्य आहेत. शहर विकास आघाडीच्या बेबीताई बुरांडे, टिकेश चौधरी, सत्यशील डोर्लीकर, नर्मदा कुकूडकर, नंदा डोर्लीकर, सविता गायकवाड, ज्योत्स्ना मेश्राम, माया ठाकूर, वर्षा देशमुख हे नवीन उमेदवार पहिल्यांदाच निवडून आले आहेत.
भाजपचे दिवाकर कुंदोजवार, राजू पोटवार, मोहना कुकूडकर, वृंदा नामेवार, शालू भोयर, दिलीप शेख, कारू डोर्लीकर, व्यंकटेश बुर्ले, अनिल गोंगले, कमला ब्राम्हणवाडे यांना पराभव पत्कारावा लागला. ग्रा. पं. वर पहिल्यांदाच आठ महिला उमेदवार निवडून आल्या आहेत. (प्रतिनिधी)