आश्रमशाळा विद्यार्थ्यांचे अज्ञान पाहून जि.प. अध्यक्ष, शिक्षणाधिकारी हादरले
By Admin | Updated: March 5, 2016 01:16 IST2016-03-05T01:16:09+5:302016-03-05T01:16:09+5:30
अहेरी तालुका मुख्यालयापासून पाच किमी अंतरावर असलेल्या खमनचेरू येथील शासकीय आश्रमशाळेला प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र ...

आश्रमशाळा विद्यार्थ्यांचे अज्ञान पाहून जि.प. अध्यक्ष, शिक्षणाधिकारी हादरले
खमनचेरू आश्रमशाळेतील घटना : इंग्रजी वाचता आले नाही
अहेरी : अहेरी तालुका मुख्यालयापासून पाच किमी अंतरावर असलेल्या खमनचेरू येथील शासकीय आश्रमशाळेला प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद गडचिरोलीचे अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) माणिक साखरे यांनी शुक्रवारी भेट दिली. या भेटीदरम्यान इयत्ता पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांना मूळाक्षरे वाचता आले नाही. तसेच वर्ग पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाच्या पाठ्यपुस्तकामधील शब्द वाचून सांगता आले नाही, असा धक्कादायक प्रकार घडला. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा घसरलेला स्तर पाहून जिल्हा परिषद अध्यक्ष व शिक्षणाधिकारी हबकून गेलेत.
या शाळेत मुलांना बसण्यासाठी स्वतंत्र खोली नाही. ज्या खोलीत राहतात. तेथेच त्यांचे निवासस्थान आहे. तेथील फरशा उखडलेल्या स्थितीत आहेत. सत्र २०१५-१६ संपत आले असतानाही मुलांची शैक्षणिक प्रगती अतिशय सुमार दर्जाची असल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांकडे पुस्तक, गणवेश नसल्याची बाबही यावेळी निदर्शनास आली. वर्गखोली चटई नसल्याने विद्यार्थ्यांना फरशीवरच बसून अभ्यास करावा लागतो, असे दिसून आले. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांनी सर्व शाळेची पाहणी करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
या संदर्भात आपण आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना पत्र पाठवून सर्व घटनेची माहिती देणार असल्याचे प्रशांत कुत्तरमारे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. अध्यक्ष व शिक्षणाधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान आदिवासी विकास विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुरेंद्र खानेकर, मानिक जुमनाके, जिल्हा समन्वयक चौधरी, गट शिक्षणाधिकारी विक्रम गीते आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
२२७ विद्यार्थीच होते हजर
खमनचेरू येथील शासकीय आश्रमशाळेत पटसंख्येवर ३९७ विद्यार्थ्यांची नोंद आहे. त्यापैकी २२७ विद्यार्थीच अध्यक्ष व शिक्षणाधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान हजर आढळले. आश्रमशाळेत ग्रंथालये आहे. येथे कुर्वे या ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहे. २ हजार ५०० पुस्तके येथे असून मुला, मुलींना वाचन करण्यासाठी ते देण्यात आले नाही, असेही दिसून आले. कुर्वे यांनी संध्याकाळी ५ ते ६ या वेळात पुस्तके द्यावेत व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. तसेच प्रभारी मुख्याध्यापक एस. के. बेडके यांनी शैक्षणिक व प्रशासकीय बाबीकडे लक्ष द्यावे, अशा सूचना अध्यक्ष कुत्तरमारे यांनी केल्या.