आश्रमशाळा नव्या इमारतीचा प्रस्ताव चार वर्षांपासून धूळखात

By Admin | Updated: August 5, 2016 01:11 IST2016-08-05T01:11:42+5:302016-08-05T01:11:42+5:30

आदिवासी विकास विभागाच्या भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत चालविल्या जाणाऱ्या....

Ashram Shala proposes new building for Dhalak for four years | आश्रमशाळा नव्या इमारतीचा प्रस्ताव चार वर्षांपासून धूळखात

आश्रमशाळा नव्या इमारतीचा प्रस्ताव चार वर्षांपासून धूळखात

एटीसींकडे तक्रार : जारावंडी आश्रमशाळेत सुविधांचा अभाव
एटापल्ली : आदिवासी विकास विभागाच्या भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत चालविल्या जाणाऱ्या जारावंडी येथील शासकीय आश्रमशाळेत विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. विशेष म्हणजे, येथील शाळा व्यवस्थापन समितीने नव्या इमारतीचा प्रस्ताव सन २०१२ मध्ये पारीत केला. मात्र प्रकल्प अधिकाऱ्यांकडे सदर प्रस्ताव चार वर्षांपासून धूळखात पडला आहे. परिणामी येथील विद्यार्थ्यांना जीर्ण इमारतीतूनच शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहे.
जारावंडी आश्रमशाळेतील विविध समस्यासंदर्भात शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अप्पर आयुक्त नागपूर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. जारावंडी येथील आश्रमशाळेत एक ते बारावीपर्यंतच्या शिक्षणाची सुविधा आहे. येथे १० वर्गखोल्या असून चार वर्गखोल्या कमी पडत आहे. तब्बल ६५० विद्यार्थी संख्येला या आश्रमशाळेची जुनी इमारत अपुरी पडत आहे. एक ते सातच्या विद्यार्थ्यांसाठी येथे वसतिगृहाची स्वतंत्र इमारत नाही. त्यामुळे विद्यार्थी हॉलमध्ये निवासी राहतात. येथेच भोजन करतात व येथेच वर्गही भरविली जातात. या आश्रमशाळेत इयत्ता दहावी व बारावीच्या विज्ञान विषयाच्या प्रात्याक्षिकासाठी एक छोटीशी प्रयोगशाळा आहे. एकाच खोलीत जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र विषयाचे साहित्य ठेवले जात आहे.
जारावंडी आश्रमशाळेतील सर्व समस्या तत्काळ निकाली काढण्यात याव्या, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुधाकर टेकाम, उपाध्यक्ष शालिकराम गेडाम, सदस्य हरिदास टेकाम, तुळशीदास मडावी, बाजीराव वेळदा, सुरेश मडावी, कांडे कुमोटी, दिलीप दास, सुनिता गेडाम, जयवंती कल्लो, रूकमा उसेंडी, जिवती येक्का आदींनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)

शिक्षकांची पदे रिक्त
मागील दोन वर्षापासून जारावंडी येथील आश्रमशाळेत बारावी विज्ञान शाखेला शिकविण्यासाठी गणित, रसायनशास्त्र, जीवशास्त्र विषयाकरिता उच्च माध्यमिक शिक्षक नाहीत. तसेच दहावीच्या गणित विषयाकरिता दोन वर्षापासून शिक्षक नाही. या आश्रमशाळेत शिक्षकांची अनेक पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.

 

Web Title: Ashram Shala proposes new building for Dhalak for four years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.