आश्रमशाळा गुरूदेव सेवा मंडळाला देणार
By Admin | Updated: September 18, 2016 01:50 IST2016-09-18T01:50:41+5:302016-09-18T01:50:41+5:30
वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे श्रध्दास्थान व स्मारक असलेली अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील

आश्रमशाळा गुरूदेव सेवा मंडळाला देणार
सुधीर मुनगंटीवारांचे आश्वासन : मुंबईत अधिकाऱ्यांसमवेत झाली बैठक
कमलापूर : वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे श्रध्दास्थान व स्मारक असलेली अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील श्री गुरूदेव आश्रमशाळा हस्तांतरणासंदर्भात एक ते दीड महिन्याच्या कालावधीत योग्य निर्णय घेऊन तो जाहीर करू, अशी कबुली मुंबईच्या बैठकीला उपस्थित राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली, अशी माहिती कमलापूर येथे बैठकीत गुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे यांनी दिली.
गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली सदर आश्रमशाळा वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी १९५८ मध्ये श्रमदान व लोकसहभागातून उभारली आहे. मात्र या आश्रमशाळेची व्यवस्थापकीय मालकी एका खासगी शिक्षण संस्थेकडे आहे. सदर आश्रमशाळा गुरूदेव सेवा मंडळाकडे हस्तांतरीत करण्यात यावी, या मागणीचा आग्रह पाहून मंत्रालयात बैठक झाली. सदर आश्रमशाळा गुरूदेव सेवा मंडळाला प्रदान करण्याचा सकारात्मक विचार करण्यात आला. त्यादृष्टीने शासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत, अशी माहिती गुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे यांनी कमलापूर येथे बैठकीत दिली.
मंत्रालयात झालेल्या या बैठकीला राज्याचे वित्त, नियोजन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आदिवासी विकास विभागाचे प्रधानसचिव राजगोपाल देवरा, आदिवासी विकास विभागाचे आयुक्त, नागपूरचे अप्पर आयुक्त, अहेरीचे सहायक प्रकल्प अधिकारी लाटकर, गुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे आदी उपस्थित होते. कमलापूर येथील श्री गुरूदेव आश्रमशाळा सन २००३ मध्ये भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्था अहेरी यांच्याकडे हस्तांतरीत करण्यात आली. तेव्हापासून सदर आश्रमशाळा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. सदर हस्तांतरण बेकायदेशीर असल्याचे गीताचार्य तुकारामदादा यांच्या लक्षात आल्यावर त्यांच्या नेतृत्वात २००५ मध्ये नागपूर अधिवेशनावर मोर्चा नेण्यात आला होता. गेल्या ११ वर्षांपासून सदर आश्रमशाळा गुरूदेव भक्तांना हस्तांतरीत करण्याबाबतची मागणी निवेदन व आंदोलनातून करण्यात येत आहे. कमलापूरवासीयांनी या संदर्भात शासनस्तरावर निवेदन दिली. या निवेदनाची दखल घेऊन ७ सप्टेंबर रोजी मंत्रालयात या विषयावर बैठक पार पडली. या सर्व घटनाक्रमाबाबत माहिती कमलापूरात बैठक घेऊन देण्यात आली. या बैठकीला डॉ. शिवनाथ कुंभारे यांच्यासह पंडित पुडके, सुखदेव वेठे, धनपाल मसराम, पुरूषोत्तम कुळमेथे, विजय खरवडे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
गुरूदेव सेवा मंडळाने सुचविले तीन पर्याय
मुंबई येथे झालेल्या बैठकीत गुरूदेव सेवा मंडळाच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे उपस्थित होते. त्यांनी या बैठकीत तीन पर्याय सुचविले. यामध्ये सदर शाळा शासनजमा करण्यात यावी, वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय शिक्षण संस्था कमलापूर या संस्थेस हस्तांतरीत करावीत, तसेच अखिल भारतीय गुरूदेव व्यायाम व शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोली यांचेकडे हस्तांतरीत करण्यात यावे, या पर्यायांचा समावेश आहे.