एप्रिल लागताच वाढला उकाडा, कूलर, एसी दुरुस्त करा हाे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2022 05:00 AM2022-04-06T05:00:00+5:302022-04-06T05:00:23+5:30

 उन्हाच्या तीव्रतेमुळे वर्षभर घरात पडून असलेले कूलर नागरिकांनी काढण्यास सुरुवात केली आहे. ग्रामीण भागात तर एवढ्या लवकर न दिसणारे कूलर, पंखे दुरुस्ती कामाची लगबग वाढली आहे. वर्षभर कूलर बंद राहत असल्याने कूलर सुरू करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे नागरिक कारागिरांच्या मागे धावत आहेत. यामुळे कूलर, पंखे दुरुस्त करणाऱ्या कारागिरांना सद्य:स्थितीत मात्र अच्छे दिन आले आहेत.

As soon as April comes, fix Ukada, cooler, AC! | एप्रिल लागताच वाढला उकाडा, कूलर, एसी दुरुस्त करा हाे !

एप्रिल लागताच वाढला उकाडा, कूलर, एसी दुरुस्त करा हाे !

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दरवर्षी जवळपास एप्रिल महिन्यानंतर गावखेड्यातील कूलर सुरू करण्याकडे नागरिकांचा कल असतो. मात्र, यावर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून उन्हाचे चटके जाणवू लागल्याने अडगळीत पडलेले कूलर दुरुस्तीकरिता नागरिकांची लगबग वाढली आहे.
 एरव्ही जून महिन्यात उष्णतेची सर्वांत जास्त झळ बसत असते. मात्र, मागील काही वर्षांपासून जिल्ह्यातील तापमानात सातत्याने वाढ हाेत असल्याचे दिसून येत आहे. यातही मार्च महिन्यातच उन्हाची काहिली जाणवण्यास सुरुवात झाली आहे. दरवर्षी जवळपास मे-जून महिन्यांत तापमान अगदी शिगेला पोहोचते. त्यामुळे गर्मीपासून संरक्षण करण्याकरिता सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयात कूलर, पंख्याचा वापर या कालावधीत सुरू होतो. मात्र, यावर्षी ऊन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तापमानाच्या लहरीपणामुळे नागरिक धास्तावले आहेत. 
 उन्हाच्या तीव्रतेमुळे वर्षभर घरात पडून असलेले कूलर नागरिकांनी काढण्यास सुरुवात केली आहे. ग्रामीण भागात तर एवढ्या लवकर न दिसणारे कूलर, पंखे दुरुस्ती कामाची लगबग वाढली आहे. वर्षभर कूलर बंद राहत असल्याने कूलर सुरू करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे नागरिक कारागिरांच्या मागे धावत आहेत. यामुळे कूलर, पंखे दुरुस्त करणाऱ्या कारागिरांना सद्य:स्थितीत मात्र अच्छे दिन आले आहेत.
यावर्षी कुलर दुरूस्ती व विविध सुटे पार्टला अधिक पैसे माेजावे लागत आहेत. दाेन वर्ष काेराेनाचे संकट असल्याने अनेकांवर बेराेजगारीची संकट काेसळले. व्यवसाय डबगाईस आले. दरम्यान यातून भरून निघण्यासाठी काही कारागिरांनी आपल्या मजुरीचे दर वाढविले आहेत. पेट्राेल व डिझेल दरवाढीमुळे पंखे, कुलर साहित्याच्या वाहतुकीचा खर्च वाढला आहे. 

कामाचे वेळापत्रक कोलमडले
-    गावखेड्यात नागरिक उन्हापासून संरक्षण होण्यासाठी सकाळी ७ वाजतापासून दुपारी दीड वाजेपर्यंत शेतात काम करायचे. मात्र, यावर्षी उन्हाचा पारा शिगेला पोहोचल्याने,  शेतमजूर, गवंडी कामगारांची लाही होत आहे. अक्षरश: अंग पोळून निघण्यासारखे ऊन तापत असल्याने शेतकरी, मजुरांच्या कामाचे वेळापत्रक कोलमडले आहे.  उन्हाच्या तडाख्याने शेतमजुर व बांधकाम मजुरही सकाळी लवकर कामावर जात आहेत. 

गुरेढोरेही सावलीच्या आडोशाला
-    वाढत्या तापमानाची झळ मानवासह पशु, पक्षी, वन्यप्राण्यांना बसू लागली आहे. वाढत्या तापमानामुळे गुरेढोरेही रानात चरण्यापेक्षा सावलीचा आडोसा घेण्याला अधिक पसंती देत आहेत. आतापासून उन्हाची तीव्रता वाढली असल्याने येत्या काळात रानातील विहिरींना, पाणवठ्यावर, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असलेल्या ठिकाणांवर गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

 

Web Title: As soon as April comes, fix Ukada, cooler, AC!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.